धाराशिव, सोलापूर, सांगली उपांत्य फेरीत
राज्य कुमार व मुली खो-खो स्पर्धा : पुणे, ठाणेही सेमीफायनलमध्ये
प्रतिनिधी/ धाराशिव
सुवर्ण महोत्सवी 50 वी कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत यजमान धाराशिवसह सोलापूर व सांगली या जिह्याच्या कुमार व मुली संघांनी दोन्ही गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला. कुमार गटात पुणे व मुलींच्या गटात गटात ठाणे जिह्यानेही उपांत्य फेरी गाठली.
महाराष्ट्र खोखो असोसिएशन व उस्मानाबाद जिल्हा खो खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या या स्पर्धेत कुमार गटात पुणे विरुद्ध ठाणे हा सामना वगळता तिन्ही सामने एकतर्फी झाले. पुण्याने ठाण्याचा 14-12 असा दोन गुण चार मिनिटे राखून पराभव केला. भावेश माशेरे (2.20, 1.10 मि. व 3 गुण) व विलास मालुसरे (2.20, 1.40 मिनिटे संरक्षण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
दुसऱ्या सामन्यात सोलापूरने अहिल्यानगरवर 11-9 असा एक डावाने दणदणीत विजय मिळविला. त्यांच्या सुजित मेटकरी (3,1.10 मि.व 2 गुण) व फराज शेख (1.50 मि. 3 गुण) यांनी अष्टपैलू खेळी केली. कर्णधार कृष्णा बनसोडेने (3.20 व 2.40 मि.) संरक्षणाची शानदार खेळी केली. अहिल्यानगरकडून अनेक वाल्हेकर (2.10 मि.) व कृष्णा कपनर (4) यानी लढत दिली. तिसऱ्या सामन्यात सांगलीने नाशिकवर 11-8 अशी डावाने एकतर्फी मात केली. सांगलीकडून अथर्व पाटील याने (2.40 मि. व 2गुण) अष्टपैलू खेळ केला. प्रज्वल बनसोडे व सुजल माने यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. नाशिककडून म्हणून वाळवणे (1.40 मि. 2 गडी) याचे प्रयत्न अपुरे पडले. चौथ्या सामन्यात हरद्या वसावेच्या अष्टपैलू खेळामुळे धाराशिवने मुंबईचा 15-6 असा डावाने धुव्वा उडविला.
पिछाडीवरून सोलापूरची नाशिकवर मात
मुलींच्या गटात नाशिक विरुद्ध सोलापूर हा सामना अत्यंत चूरशीचा झाला. मध्यंतराच्या 4-7 अशा पिछाडीवरून सोलापूरने 13-9 अशी चार गुणांनी बाजी मारली. पहिल्या डावात एका मिनिटात बाद झालेल्या स्नेहा लामकाने हिने दुसऱ्या डावात पाच मिनिटे संरक्षणाचा किल्ला लढविला. तिने आपल्या धारदार आक्रमणात पाच गडीही टिपले. नाशिककडून सुषमा चौधरी हिने (2,2.30मि. व नाबाद 50 सेकंद) लढत दिली. मुलींच्या गटातील दुसऱ्या सामन्यात धाराशिवने रत्नागिरीवर 14-7 असा डावाने विजय मिळवला. अश्विनी शिंदे हिने 4 तर सुहानी धोत्रे हिने 2.20 मि. पळती केली. सुहानीने आपल्या धारदार आक्रमणात पाच गडीही टिपले.
तिसऱ्या सामन्यात ठाण्याने मुंबई उपनगरला 9-6 असे एका डावाने नमवले. धनश्री कंक हिने चार मिनिट व सांगवी तळवडेकर हिने नाबाद 1.30 मिनिटे पळती करीत तीन गडी बाद केले. चौथ्या सामन्यात सांगलीने पुण्यास 9-5 असे डावाने हरवले. अष्टपैलू खेळी करणारी प्रतीक्षा बिराजदार ही त्यांच्या विजयाची शिल्पकार ठरली.
असे होणार उपांत्य सामने
कुमार : सोलापूर-सांगली, धाराशिव-पुणे.
मुली : धाराशिव-ठाणे, सांगली-सोलापूर.