धाराशीवमध्ये 'राष्ट्रवादी'चा उमेदवार ठरला? अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार!
उमरगा प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन 15 दिवस झाल्यानंतर सर्वच पक्षांची जोरदार धामधूम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांनी प्रचंड ताकद लावलेल्या धाराशिव मतदारसंघाचा तिढा अखेर सोमवारी सुटला आहे. धाराशिवमध्ये आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये लोकसभेसाठी राष्ट्रवादीत हा मोठा पक्षप्रवेश होणार आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहीती सूत्राकडून आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील धाराशिव- कळंब, तुळजापूर, उमरगा-लोहारा, भूम-परंडा या चार विधानसभा मतदारसंघाचा तसेच लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
तुळजापूर ( राणा जगजितसिंह पाटील) , औसा ( अभिमन्यू पवार) आणि बार्शी ( राजेंद्र राऊत ) विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाजपचे , उमरगा-लोहारा ( ज्ञानराज चौगुले ) भूम-परंडा ( तानाजी सावंत ) या विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना शिंदे गटाचे आहेत तर धाराशिव-कळंब ( कैलास पाटील ) विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेना ठाकरे गटाचे आहेत. एकंदरीत रागरंग पाहता.आता धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी दिर भावजयीत लढत होणार आहे.
कोण आहेत अर्चना पाटील ?
अर्चना पाटील यांनी यापूर्वी धाराशिव जिल्हा परिषद उपाध्यक्षपद भूषवले आहे. लेडीज क्लब या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा असुन धाराशिव जिल्ह्यात मोठे महिला संघटन, दांडिया महोत्सव, नवरात्र यासह अन्य महिलांचे कार्यक्रम आयोजन केले आहेत.