धाराशिव जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले! रब्बी पिकांना तारले...द्राक्षबागायतदारांचा सुपडा साफ
धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यास मंगळवारी व बुधवारी पहाटेच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढले. यामध्ये सर्वाधिक द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, दुसरीकडे अवकाळी पावसाने हरभरा, गहू पिकांना जीवदान दिले आहे. नुकसानीचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्ह्यात दोन-दिवसापासून ढगाळ वातावरण असुन मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पाऊस बरसला. वादळी वाऱ्यामुळे उंच आलेल्या ज्वारी पूर्ण:त आडव्या झाल्या आहेत तर तुळजापूर तालुक्यातील काटी कृषी मंडळ मध्ये 850 हेक्टर वरील द्राक्ष बागांना फटका बसला. फुलोराऱ्यात आलेल्या तुरी पिकास हा पाऊस धोकादायक ठरणार आहे. धाराशिव जिल्ह्यावर कधी दुष्काळ, कधी आवर्षण तर कधी गारपीट या संकटाचे कायम दुष्टचक्र सुरु आहे. या नैसर्गिक दुष्टचक्रात सर्वाधिक शेतकरी भरडला जात असुन सर्वाधिक हानीची झळ हि शेतकऱ्यांना बसत आहे. सध्याचा पाऊस हा ज्वारीसाठी चांगलाच आहे. मात्र, या पावसामुळे तुरीचे व द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुकानिहाय मिली मिटर मध्ये झालेला पाऊस
धाराशिव - 16.8
तुळजापूर - 22.7
परंडा - 21.9
भूम - 27.3
कळंब - 28.8
उमरगा - 18.8
लोहारा - 6.1
वाशी - 14.4
वीज पडल्याने तीन दुधाळ गाई दगावल्या
कळंब तालुक्यातील बांगरवाडी येथील नवनाथ भुजंग बांगर व रामराव जरिचंद सानप तसेच दुधाळवाडी येथील हरिचंद्र लाटे यांच्या दुभत्या गाई वीज कोसळल्याने दगावल्या. यामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे..