धर्मवीर संभाजी महाराजांचे कार्य अतुलनीय
निलजीत संभाजी महाराजांच्या मूर्ती उद्घाटनप्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन : महाराजांचे कार्य सदैव सर्वांसाठी प्रेरणादायी
वार्ताहर/सांबरा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कमी वयात हिंदू धर्म आणि रक्षणासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. त्यांचे कार्य सदैव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. त्या निलजी येथे श्रीराम सेना हिंदुस्थान व ग्रामस्थांतर्फे नव्याने उभारलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्ती उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. रविवार दि. 3 रोजी सकाळी सवाद्य मिरवणुकीने गावातील सर्व देवीदेवतांचे पूजन करण्यात आले. सकाळी दहा वाजता धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. यावेळी चौथरा पूजन व चौकाचे नामकरणही करण्यात आले.
त्यानंतर महाराष्ट्रातील युवा व्याख्याते सुदर्शन शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराजांचा ज्वलंत इतिहास आपल्या तडफदार भाषण शैलीतून सर्वांसमोर आणला. उद्घाटन कार्यक्रमास नेते मृणाल हेब्बाळकर, अलौकिक ध्यान मंदिरचे शिवानंद गुऊजी, बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम, ग्रा. पं. अध्यक्ष सतीश शहापूरकर, उपाध्यक्षा विनंती गोमानाचे, श्रीराम सेना हिंदुस्थानचे तालुका अध्यक्ष भरत पाटील, राघवेंद्र कोचेरी, बाळू देसूरकर, युवराज जाधव, सुनील अष्टेकर, निलजी श्रीराम सेना शाखा प्रमुख संदीप मोदगेकर, आर. एम. चौगुलेंसह मान्यवर उपस्थित होते. सोमवार दि. 4 पासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रात्री भव्य लेझर शो व त्यानंतर ‘पुत्र अमृताचा’ हे महानाट्या सादर करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या उद्घाटन सोहळ्याला हजारो शंभूभक्त व नागरिक उपस्थित होते.