धर्मवीर संभाजी चौकातील बसथांबा बनला वाहनतळ
दिवाळीची गर्दी : प्रशासनाने वाहनांना शिस्त लावण्याची मागणी
बेळगाव : दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या वाहनधारकांना सोमवारी धर्म संभाजी चौक येथील बसथांब्यावरच वाहने थांबवावी लागल्याने मोठी गैरसोय झाली. दरम्यान या वाहनांमुळे हा बसथांबा वाहनतळ बनला होता. यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांबरोबर प्रवाशांची गैरसोय झाली. दिवाळी उत्साहात प्रारंभ झाली आहे. दरम्यान खरेदीसाठी बाजारात बेळगावसह खानापूर, गोवा आणि इतर ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नागरिक दाखल होऊ लागले आहेत. दरम्यान गर्दी टाळण्यासाठी शहराच्या मुख्य रस्त्यावर बॅरिकेड्स लावून वाहनांना निर्बंध घातले जात आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी धं. संभाजी चौक येथील बसथांब्यावरच वाहने पार्क केली. या बसथांब्यावर चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे येथील प्रवाशांचीही हेळसांड झाली. शिवाय येथून ये-जा करणाऱ्या वाहतुकीलाही मोठा अडथळा निर्माण झाला. मागील चार दिवसांपासून शहरात दिवाळीच्या खरेदीची गर्दी वाढू लागली आहे. गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, किर्लोस्कर रोड, मारुती गल्ली, खडेबाजार आदी ठिकाणी गर्दी होत आहे. दरम्यान शहरातील गर्दी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी किर्लोस्कर रोड, यंदे खुट, गणपत गल्ली आणि इतर ठिकाणी बॅरिकेड्स लावून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
शहरात चारचाकी वाहनांना निर्बंध
दरम्यान शहरात चारचाकी वाहनांना निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे चारचाकी वाहनधारक शहराबाहेर जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करीत आहेत. मात्र अशा वाहनांमुळे वाहतुकीला आणि प्रवाशांना मोठा अडथळा निर्माण होऊ लागला आहे. प्रशासनाने अशा वाहनांना शिस्त लावावी अशी मागणी होत आहे.