For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचा क्लब थ्रो मध्ये दुहेरी धमाका

06:10 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारताचा क्लब थ्रो मध्ये दुहेरी धमाका
Advertisement

धरमबीरला सुवर्ण तर प्रणवला रौप्य : पॅरा तिरंदाजीत हरविंदरची सुवर्णमय कामगिरी,  पदकतालिकेत भारताची 13 व्या स्थानी झेप

Advertisement

वृत्तसंस्था/पॅरिस

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मेन्स क्लब थ्रो स्पर्धा भारतासाठी फलदायी ठरली. प्रथमच या प्रकारात धरमबीर आणि प्रणव सुरमा यांनी चमत्कार करत भारतासाठी एकाच स्पर्धेत दोन पदके जिंकले आहेत. बुधवारी रात्री उशिरा झालेल्या क्लब थ्रो एफ51 च्या फायनलमध्ये धरमबीरने सुवर्णपदक, तर प्रणव सूरमाने रौप्यपदक पटकावले. याशिवाय, पुरुषांच्या रिकर्व्ह तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंगने सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली. विशेष म्हणजे, हरविंदर पॅरालिम्पिकच्या इतिहासात तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. यासह भारताची पदकसंख्या 24 झाली आहे. यामध्ये 5 सुवर्ण 9 रौप्य व 10 कांस्यपदकांचा समावेश आहे.

Advertisement

बुधवारी सांगलीच्या सचिन खिलारीने पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात रौप्य जिंकत इतिहास रचला. तब्बल 40 वर्षानंतर भारताला एफ 46 प्रकारात पदक मिळाले, हे विशेष. यानंतर रात्री उशिरा पुरुषांचे क्लब थ्रोचे सामने झाले. यामध्ये भारताच्या धरमबीर व प्रणव सूरमा यांनी सहभाग घेतला होता. प्रारंभी, धरमबीरची सुरुवात खराब झाली. त्याचे पहिले चार थ्रो फाऊल होते. यानंतर पाचव्या थ्रोमध्ये त्याने आपला सर्व अनुभव पणाला लावत 34.92 मीटर अंतरापर्यंत थ्रो केला, जो त्याचा सर्वात्कृष्ट थ्रो ठरला. या कामगिरीसह त्याने नवा आशियाई विक्रम देखील केला. याआधी 35 वर्षीय हरियाणाच्या या खेळाडूने रियो व टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता पण पदक जिंकण्यात त्याला अपयश आले होते. दरम्यान, 34.92 मीटरच्या उत्कृष्ट थ्रोसह सुवर्णपदकाला गवसणी घातली.

धरमबीर, हरविंदरचा संघर्षमय प्रवास

35 वर्षीय धरमबीरने केवळ सुवर्णपदक जिंकले नाही तर यासह क्लब थ्रो या प्रकारात इतिहास रचला आहे. पॅरालिम्पिकमध्ये या स्पर्धेत भारताने पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, इथपर्यंतचा प्रवास धरमबीरसाठी सोपा नव्हता. काही वर्षापूर्वी धरमबीर आपल्या गावातील एका कालव्यात पोहायला गेला तेव्हा त्याला पाण्याची खोली समजू शकली नाही. पाण्यात उडी मारताच तो खाली असलेल्या दगडांवर आदळला. या अपघातात त्याच्या कमरेला गंभीर दुखापत झाली.  रुग्णालयात नेले असता पाठीच्या कण्याला दुखापत झाल्याचे आढळून आले. इथून क्षणार्धात त्याचे आयुष्य बदलले. पण, तो खचला नाही. चंदीगडमध्ये 2014 सालापासून त्याने क्लब थ्रो खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला पण अथक सरावानंतर यामध्ये तो यशस्वी झाला. क्लब थ्रो हा लाठी फेकण्याचा खेळ आहे, हातोडा फेकल्यासारखा आहे. या दरम्यान, खेळाडू फेकण्यासाठी खांदे आणि हात वापरू शकतो.

तिरंदाज हरविंदर सिंगचा देखील प्रवास रोमांचकारी असा आहे. अतिशय खडतर परिस्थितीतून त्याने हे यश मिळवले आहे. हरियाणातील अजित नगर येथील हरविंदर हा दीड वर्षांचा असताना डेंग्यूने ग्रस्त होता. डेंग्यूच्या उपचाराकरिता त्याला इंजेक्शन देण्यात आले होते. दुर्दैवाने, या इंजेक्शन्सच्या दुष्परिणामांमुळे त्याच्या पायातील गतिशीलता कमी झाली. या सर्व आव्हानांचा सामना करत हरविंदरने तिरंदाजी केली. आज घडीला, अर्जुन पुरस्काराचा मानकरी असलेल्या हरविंदरने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवले आहे.

प्रणव सूरमाला रौप्य

दुसरीकडे, प्रणव सूरमाने याच स्पर्धेत रौप्यपदकाला गवसणी घातली. प्रणवने पहिला थ्रो 34.59 मीटर, दुसरा थ्रो 34.19 मीटर केला तर तिसरा थ्रो फाऊल होता. उरलेल्या तीन थ्रोमध्येही तो पहिल्या प्रयत्नापर्यंत पोहोचू शकला नाही. त्याच्या पहिल्याच थ्रोमुळे त्याला रौप्यपदक मिळाले. दरम्यान, सर्बियाच्या जेल्को दिमित्रीजेविकने 34.18 फेकसह कांस्यपदक जिंकले. यासोबत स्पर्धेत सहभागी होणारा तिसरा भारतीय अमित कुमार पदक जिंकू शकला नाही. तो केवळ 23.96 असा सर्वोत्तम थ्रो करु शकला.

हरियाणाच्या हरविंदरची कमाल,तिरंदाजीत जिंकले ऐतिहासिक गोल्ड

पॅरालिम्पिकमध्ये बुधवारी रात्री उशिरा तिरंदाज हरविंदर सिंगने सुवर्णपदक जिंकले. 33 वर्षीय हरविंदरने पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपनच्या अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा 6-0 असा पराभव केला. या कामगिरीसह हरविंदर आता पॅरालिम्पिकच्या इतिहासात तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी त्याने टोकियो पॅरालिम्पिकमध्येही नवा विक्रम केला होता. त्यावेळी, पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकणारा तो पहिला तिरंदाज ठरला होता. यंदाच्या स्पर्धेतील तिरंदाजीमधील भारताचे हे दुसरे पदक आहे. याआधी शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी मिश्र सांघिक कंपाऊंड प्रकारात कांस्यपदक जिंकले होते. दरम्यान, हरविंदरला पॅरालिम्पिकच्या इतिहासातील तिसरे पदक जिंकण्याची नामी संधी आहे. तो आता पूजा जटायनसह रिकर्व्ह तिरंदाजीच्या मिश्र सांघिक स्पर्धेत पदकासाठी स्पर्धा करेल.

भारतासाठी विक्रमी पॅरालिम्पिक

गुरुवारी पॅरालिम्पिकमधील स्पर्धेचा आठवा दिवस होता. भारताने आतापर्यंत एकूण 24 पदके जिंकली आहेत, ज्यात 5 सुवर्ण, 9 रौप्य आणि 10 कांस्य पदकांचा समावेश आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशीच भारताने टोकियो पॅरालिम्पिकमधील सर्वाधिक पदकांचा विक्रम मोडित काढला. सध्याच्या पॅरालिम्पिकमध्ये भारत पदकतालिकेत 13 व्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत अवनी लेखरा (नेमबाजी), नितेश कुमार (बॅडमिंटन), सुमित अंतिल (भालाफेक), हरविंदर सिंग (तिरंदाजी) आणि धरमबीर सिंग (क्लब थ्रो) यांनी भारतासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत.

Advertisement
Tags :

.