‘आमदार पेन्शन’साठी धनखड यांचा अर्ज
राज्यपाल झाल्यानंतर 2019 पासून निवृत्तीवेतन बंद
वृत्तसंस्था/ जयपूर
भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजस्थान विधानसभेचे माजी आमदार म्हणून पेन्शनसाठी अर्ज केला आहे. धनखड हे 1993 ते 1998 पर्यंत अजमेर जिह्यातील किशनगढ भागातील आमदार होते. उपराष्ट्रपतिपद सोडल्यानंतर त्यांनी आता या पेन्शनसाठी औपचारिक अर्ज केला आहे. विधानसभा सचिवालयाने त्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू केली आहे. जगदीप धनखड यांच्या अर्जाची पात्रता तपासणीची प्रक्रिया सध्या सुरू असल्याचे विधानसभा सचिवालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
जगदीप धनखड यांचे राजकीय जीवन दीर्घ आणि वैविध्यपूर्ण आहे. ते 1989 ते 1991 पर्यंत झुंझुनू येथून जनता दलाचे खासदार होते. ते चंद्रशेखर सरकारमध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री देखील झाले. त्यानंतर 1993 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर किशनगढ येथून आमदार म्हणून निवडून आले. 2019 ते 2022 पर्यंत त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम केल्यानंतर 2022 ते 2025 पर्यंत देशाचे उपराष्ट्रपती होते. आता माजी आमदार म्हणून त्यांनी पेन्शनची मागणी केली आहे.
राजस्थान सरकारच्या नियमांनुसार, माजी आमदारांना त्यांच्या कार्यकाळाच्या कालावधीनुसार पेन्शन आणि इतर सुविधा मिळतील. धनखड यांचा 1993 ते 1998 पर्यंतचा त्यांचा आमदार पदाचा कार्यकाळ आधार म्हणून विचारात घेतला जाईल. त्यांचा अर्ज मंजूर झाला तर त्यांना दरमहा सुमारे 42 हजार रुपये पेन्शन मिळेल. याशिवाय, त्यांना वैद्यकीय सुविधा, प्रवास भत्ता आणि काही प्रशासकीय फायदे देखील मिळू शकतात.