धनगरांना येळळूर मालकी रानात मेंढरं चरावयास बंदी घालावी
वार्ताहर/येळळूर
येळळूर गाव हा प्रामुख्याने शेतीप्रधान असून येथे शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. हा शेतकऱ्यांचा एक आर्थिक स्रोताचा मार्ग असून बरेच शेतकरी यावर आपली उपजीविका चालवतात. यासाठी लागणारे हिरवे वैरण प्रामुख्याने अरवाळी धरण क्षेत्र व राजहंसगडाच्या पायथ्याशी असलेल्या माळरानातून आणली जाते. हे क्षेत्र शेतकऱ्यांच्या मालकीचे असून या वैरणीच्या जीवावरच त्यांचा दुग्धव्यवसाय चालतो. पण या वैरणीत धामणे व कुरबरहट्टीचे धनगर राजरोसपणे मेंढरं सोडून वैरणीची नासधूस करतात. एकदा मेंढरं वैरणीत फिरली की ती वैरण इतर जनावरे खात नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना वैरणीची टंचाई जाणवते. यासाठी त्यांना जुलै ते जानेवारीपर्यंत या वैरणीत मेंढरं सोडू नयेत.
शिवाय शिवारात कडधान्य, टरबूज, काकडी यासारखी उभी पिके असताना शिवारत मेंढरं घालून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्यांना समज द्यावी, अशा आशयाचे निवेदन येळळूर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यल्लाप्पा टक्केकर व पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांना देऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. याबाबत धनगरांना प्रत्यक्ष भेटून त्यांना विनंती करूनही ते शेतकऱ्यांना जुमानत नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याचा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. ही समस्या प्रत्येक वर्षाचीच असून यामुळे अनेकवेळा वादाचे प्रसंगही निर्माण होतात. पुढे काही विपरीत घडू नये, यासाठी येळळूर देवस्थान कमिटीने ग्रा.पं.च्या माध्यमातून धनगरांना प्रत्यक्ष बोलावून घेवून त्यांना समज द्यावी, असे यावेळी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षांना सांगीतले. यावेळी उपाध्यक्ष मारुती मजुकर, सेक्रेटरी अशोक धामणेकर, गोपाळ कुगजी, यलुप्पा पाटील, नागेंद्र चतुर, सुभाष मजुकर, चांगाप्पा गोरल यांच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होता.