धनगर-गवळी समाजाचे तहसीलदारांना निवेदन
जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासनाची पूर्तता न केल्याने धनगर-गवळी समाजाचा मोर्चा
खानापूर : तालुक्यातील धनगर-गवळी समाजातर्फे समस्या सोडवण्याबाबत खानापूर तहसीलदार दुंडाप्पा कोम्मार यांना नुकतेच निवेदन देण्यात आले. यापूर्वी विधान परिषद सदस्य शांताराम सिद्धी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी खानापर येथे समाजाची बैठक घेऊन समस्या सोडवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र बैठक न घेतल्याने धनगर-गवळी समाजाने मोर्चा काढून रस्ता, वीज, अंगणवाडी, शाळा, बस वाहतूक यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांनी निवेदनाचा स्वीकार करून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुढील क्रम घेऊ, असे आश्वासन दिले.
पाच वाड्यांवर अद्यापही वीजपुरवठा नाही
तालुक्यात धनगर-गवळी समाजाचे 36 गवळीवाडे आहेत. त्यापैकी 18 गवळीवाडे अतिशय दुर्गम आणि घनदाट वनक्षेत्रात आहेत. त्यापैकी पाच वाड्यांवर अद्यापही वीजपुरवठा पोहोचलेला नाही. 25 पेक्षा जास्त वाड्यांमध्ये रस्ते, स्वच्छ पिण्याचे पाणी, अंगणवाडी आणि शाळा यासारख्या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. अनेक वाड्या महसूल गाव अंतर्गत नोंदणीकृत नाहीत. त्यामुळे रेशन, शाळा व इतर सरकारी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या समाजातील विद्यार्थ्यांना सरकारी वसतिगृहामध्ये प्रवेशाचा लाभ मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. धनगर-गवळी समाजाचा प्रवर्ग 2 मध्ये समावेश करण्यात आला आहे.
एकाच वेळी धनगर समाजाच्या सर्व समस्यांचे निवारण करा
इतर जिह्यांप्रमाणे प्रवर्ग एकमध्ये समावेश करून तसे जात प्रमाणपत्र देण्यात यावे. तसेच घरे नसलेल्यांना घरे मंजूर करून शौचालय व इतर सुविधा पुरवाव्यात. निरक्षरतेमुळे रेशन कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्रात अनेक चुका आहेत. शासकीय अनुदान आणि योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. त्यासाठी विशेष दुरुस्ती अदालतीचे आयोजन करून एकाच वेळी धनगर समाजाच्या सर्व बांधवांच्या समस्यांचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी धनगर-गवळी समाज जिल्हा समितीचे अध्यक्ष अप्पू शिंदे, उपाध्यक्ष भैरू पाटील, सचिव बमू पाटील, गंगाराम बावदाने, वाघू पाटील, बाबू बावदाने, नवलू आवणे, गंगाराम बोडके, बमू खरवत, सगू थोरवत, बाबू शिंदे, नवलू पाटील, नानू पाटील, चिंगूळ बावदाने, बाबू येडगे, बाबू आवणे, रामा कोळापटे उपस्थित होते.