उत्कृष्ट सोसायटी पुरस्काराने धनश्री सोसायटीचा सन्मान
बेळगाव : बेळगाव जिल्हा सहकारी युनियन आणि सहकार खाते, बेंगळूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 ते 20 नोव्हेंबरपर्यंत ‘सहकार सप्ताहा’चे आयोजन हिरेबागेवाडी येथे करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने दररोज बेळगाव जिल्ह्यातील ज्या सहकारी सोसायटींनी गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कार्य केले आहे, अशा सोसायटींना ‘उत्कृष्ट सोसायटी’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.
बेळगाव तालुक्यातील अशा उत्कृष्ट सोसायटींचा सन्मान रविवारी करण्यात आला. अनगोळ रोडस्थित दि धनश्री को-ऑप. सोसायटीला बेळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट सोसायटी हा बहुमान देऊन गौरविण्यात आले. धनश्री सोसायटीने यावर्षी प्रथमच वार्षिक उलाढालीचा शंभर कोटींचा टप्पा पार केला असून 1 कोटी 32 लाखांचा निव्वळ नफा मिळवला आहे. तसेच या सोसायटीत 90 टक्के महिला कर्मचारी आहेत, ही एक जमेची बाजू आहे.
‘धनश्री’चे संचालक संजीव जोशी आणि जगदीश बिर्जे यांना प्रमाणपत्र, शाल, स्मृतिचिन्ह, फळाची करंडी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी संचालक शिवाजी पावले, आप्पाजी पाटील, व्यवस्थापिका विजया माळगे हेही उपस्थित होते. मलप्रभा सहकारी साखर कारखान्याचे चन्नराज हट्टीहोळी, संतोष अंगडी यांच्यासह सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.