जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात डेनेज पाईपलाईनचे काम
महापालिका फंडातून 16 लाख ऊपयांचे अनुदान मंजूर
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डेनेज व्यवस्था सुरळीतपणे व्हावी, यासाठी महापालिकेकडून पाईपलाईन घालण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या सूचनेनुसार महापालिकेकडून सदर काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी महापालिका फंडातून 16 लाख ऊपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. रेणुका झेरॉक्स ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत डेनेज पाईपलाईन घालण्यात येत आहे.
खराब डेनेज व्यवस्थेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य व पाणी साचत असल्याने समस्यांना तोंड द्यावे लागत होते. याचा नागरिकांवरही परिणाम होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या. तसेच वकिलांसाठी ये-जा करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या भुयारी मार्गावरही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. त्याचा अद्याप निचरा झालेला नाही. त्यामुळे या समस्या पूर्णपणे निकालात काढण्याची मागणी वारंवार होत होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाचा विकास करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली होती. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना देऊन डेनेज व्यवस्था सुरळीतपणे करण्याचे आदेश दिले होते. यासाठी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. यानंतर महापालिकेने 16 लाख ऊपयांचा निधी मंजूर केला. त्वरित कामाला सुरुवात होऊन रेणुका झेरॉक्स ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत डेनेज पाईपलाईन घालण्यात येत आहे. त्याचबरोबर सदर पाईपलाईन भुयारी मार्गाला जोडण्यात येणार असून पावसाळ्यात सदर मार्गावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासही मदत होणार आहे. डेनेज व्यवस्था सुरळीत होत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.