देवयानी आजगावकर यांना सेवामयी शिक्षक पुरस्कार जाहीर
साने गुरुजी कथामाला मालवणतर्फे दिला जातो पुरस्कार
आचरा | प्रतिनिधी
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवणचा प्रतिवर्षी दिला जाणारा शिक्षणतज्ञ कै. जी.टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार (२०२४) श्रीम. देवयानी आजगावकर, उच्चश्रेणी मुख्याध्यापिका, जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पेंढ-याचीवाडी, पेंडूर तालुका सावंतवाडी यांना नुकताच जाहीर झाला आहे. रोख रक्कम ५००० रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्काराचे वितरण रविवार ७ जानेवारी रोजी शिक्षणतज्ञ कै. जी. टी. गावकर कथानगरी बीडये विद्यामंदिर केंद्रशाळा आचरे नं. १ या ठिकाणी संपन्न होणार आहे, अशी माहिती सदानंद कांबळी, (अध्यक्ष पुरस्कार निवड समिती शिक्षणतज्ञ जी.टी. गावकर सेवामयी पुरस्कार) यांनी दिली.
शिक्षणतज्ञ कै. जी.टी. गावकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळ जवळ ६० वर्षे शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शक म्हणून मोलाची कामगिरी बजावली आहे. पाठ्यपुस्तक निर्मितीपासून शिक्षकांसाठी मार्गदर्शक शैक्षणिक मासिके तयार करण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे शैक्षणिक कार्य गुजरात, मुंबई (द्विभाषिक राज्य) पासून कारवार पर्यंत होते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ साने गुरुजी कथामाला मालवण तर्फे शिक्षण क्षेत्रात आदर्श कामगिरी बजावणाऱ्या शिक्षकास दरवर्षी सेवामयी शिक्षक पुरस्कार दिला जातो.
देवयानी त्रिंबक आजगावकर यांनी गेली ३५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये पू.प्रा. शाळा मुटाट पाळेकरवाडी ता. देवगड, मातोंड नाटेली ता. वेंगुर्ले, केंद्रशाळा मातोंड बांबर क्र. ५ ता. वेंगुर्ले, मळेवाड नं.५, धाकोरे नं. १ ता. सावंतवाडी, पेंढ-याची वाडी पेंडूर ता. वेंगुर्ले आदी शाळांमध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून शाळा समाजाकडे व समाज शाळेकडे येण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. सध्याची शाळा पेंढ-याचीवाडी, पेंडूर येथे शैक्षणिक कार्याबरोबरच साने गुरुजी कथामालेचे विविध उपक्रम, शैक्षणिक मार्गदर्शन, शिक्षक, पालक व समाज यांच्यासाठी विविध उपक्रम राबवून शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. त्यांच्या ३५ वर्षाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विशेष गौरव म्हणून सदर पुरस्कारासाठी निवड समितीने त्यांची निवड केली आहे. सेवामयी शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सुरेश शामराव ठाकूर, अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.