मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी अर्स यांचे योगदान अविस्मरणीय
खासदार इराण्णा कडाडी : जिल्हा प्रशासनातर्फे देवराज अर्स जयंती साजरी
बेळगाव : मागासवर्गीयांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यात व त्यांच्या जीवनाला दिशा देण्यामध्ये देवराज अर्स यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांचे स्मरण करणे आम्हा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे, असे खासदार इराण्णा कडाडी यांनी सांगितले. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, मागासवर्गीय कल्याण खाते आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने देवराज अर्स यांची 109 वी जयंती कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, देवराज अर्स यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात शोषितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न झाले आहेत. या माध्यमातून त्यांनी एक वेगळी छाप उमटवली आहे. समाजामध्ये चांगले वातावरण निर्माण करणे, देवराज अर्स यांना अनेक क्रांतिकारी निर्णय घ्यावे लागले. त्याप्रमाणे त्यांनी बदलही केला. समाजातील अनेक अनिष्ठ प्रथांवर निर्बंध आणून शोषितांना मानाने जगण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकार शोषितांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवित आहेत. या योजना पात्रताधारकांना मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांकडून संदेश
देवराज अर्स यांनी मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. ते राज्यातील एक अत्यंत प्रतिष्ठित मुख्यमंत्री होते. तर राजकारणीही उत्तम होते. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेले योगदान न विसरण्यासारखे आहे. सामाजिक, शैक्षणिकरित्या मागास असणाऱ्या समाजाला या सुविधा देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. असा संदेश जिल्हापालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला. याचे वाचन अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांनी केले. यावेळी जि. पं. उपकार्यदर्शी बसवराज हेगनायक यांचे समयोचित भाषण झाले. यावेळी आमदार राजू सेठ, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, देवराज अर्स विकास निगमचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. बानसी आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये देवराज अर्स यांच्या फोटोचे पूजन करून चन्नम्मा चौकातून मिरवणूक काढण्यात आली.