For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भक्तलक्षणे : 4

06:22 AM May 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
भक्तलक्षणे   4
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

आपला भक्त लक्षणांचा सविस्तर अभ्यास चालू आहे. भगवद्गीतेत अशी लक्षणे ज्याच्या अंगी आहेत त्याने धर्मसार सेवन केले आहे असे सांगितले आहे. ही लक्षणे ज्याच्या अंगी असतील तो भक्त बाप्पांना प्रिय होतो. अहंकारविरहीत असणे, ममतारहीत असणे, द्वेष न करणे, करूणायुक्त असणे, निर्भय असणे, कुणालाही भीती न दाखवणे इत्यादी लक्षणे आपण बघितली. भक्तापासून कुणालाही भीती नसते कारण सर्वांच्यातील ईश्वरी अस्तित्वाची जाणीव त्याला असल्याने तो सर्वांशी बंधुभावानेच वागत असतो. सर्वसामान्य माणसाची शांती आणखी एक कारणाने बिघडत असते. त्याबद्दल श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात की, त्याला जे पाहिजे ते नाहीसं होणं किंवा जे नको आहे ते ओढवणं या दोन्ही गोष्टीमुळे मनुष्य अस्वस्थ होतो. खरं बघायला गेलं तर दोन्हीही गोष्टी माणसाच्या हातात नसतात आणि कितीही प्रयत्न केला तरी ज्या गोष्टी घडायच्या आहेत त्या घडल्याशिवाय रहात नाहीत. वास्तविक पाहता याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. तरीही वर उल्लेख केलेल्या दोन्ही गोष्टींची भीती त्याला सतत वाटत असते. परंतु भक्ताला देहाबद्दल काहीच प्रीती नसल्याने त्याला काही मिळवण्याची ओढ किंवा काही हरवण्याची भीती नसते.

प्रारब्धानुसार ओढवणाऱ्या आणि सर्वसामान्य लोकांना नको असलेल्या भीतीदायक प्रसंगाचीही त्याला तमा नसते कारण दोन्ही गोष्टी ईश्वराच्या हातात असून तो जे घडवून आणेल ते आपल्या हिताचंच असेल ह्या खात्रीने आणि ईश्वराप्रति असलेल्या अतूट विश्वासाने तो निर्धास्त राहून ईश्वराच्या भक्तीत रममाण झालेला असतो. ऊद्वेग, भीती, क्रोध आणि आनंद हे माणसाचे विकार आहेत. ईश्वराच्या भक्तीच्या प्रेमात बुडून जाणाऱ्या भक्तानं या विकारांवर मात केलेली असते आणि ज्याचे विकार कमी त्याला ईश्वराची जास्त प्रचिती येत असते. भक्त प्रल्हादाला तर कसलेच विकार नसल्याने त्याला खांबातल्या ईश्वराची उपस्थिती सहजी जाणवली. असा भक्त, प्रल्हादाप्रमाणे बाप्पांचा लाडका असतोच. आता पुढील लक्षणांचा अभ्यास करू. त्याबद्दल पुढील श्लोकात बाप्पा सांगतायत की, माझा प्रिय भक्त सर्वांशी समदृष्टी बाळगतो, अविचल असतो आणि मौनात राहतो.

Advertisement

रिपौ मित्रेऽथ गर्हायां स्तुतौ शोके समऽ समुत् ।

मौनी निश्चलधीभक्तिरसंगऽ स च मे प्रियऽ ।। 17 ।।

अर्थ- शत्रु, मित्र, निंदा, स्तुति, शोक यांचे ठिकाणी जो समान व आनंदी असणारा मौनी, ज्याची बुद्धि व भक्ति निश्चल आहे असा जो संगरहित असतो तो मला प्रिय आहे.

विवरण- प्रत्येक मनुष्य दुसऱ्याचा मित्र तरी असतो किंवा शत्रू तरी असतो पण भक्ताच्या दृष्टीने प्रत्येकजण ईश्वरी अवतार असतो त्यामुळे, जे त्याच्याशी मित्रत्वाने वागतात त्यांच्याशी त्याचे प्रेमाचे संबंध असतातच पण जे शत्रुत्व करतात त्यांच्याशीही तो प्रेमाने वागत असतो. त्यांनी दिलेला त्रास त्याला त्याच्या प्रारब्धाचे भोग वाटतात. भोग भोगूनच संपवायचे असतात याची जाणीव असल्याने, तो ज्यांनी त्याला त्रास दिलेला आहे त्यांच्याबद्दल मनात कटुता बाळगत नाही. उलट त्याला त्रास देण्यासाठीच त्यांची ईश्वराने नेमणूक केली आहे अशी त्याची समजूत असते. त्याला त्रास देण्यात, त्रास देणाऱ्यांचा काहीही दोष नसून ते ईश्वराने त्यांना दिलेलं ते काम यंत्रवत करत आहेत अशी त्याची धारणा असते. तसेच भोग भोगावे लागताहेत कारण पूर्वी कधीतरी त्याने कुणाला तरी दिलेल्या त्रासाची ही परतफेड आहे हे तो ओळखून असल्याने आता हे हिशोबाचे खाते बंद होणार आणि आपण शुद्धचित्त होऊन ईश्वराच्या आणखीन समीप जाणार अशी भावना त्याच्या मनात असते.

क्रमश:

Advertisement
Tags :

.