धर्माचरणाशिवाय केलेली भक्ती निष्फळ
प.पू. परमात्मराज महाराज : हंगरगे येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापना-कळसारोहण समारंभ उत्साहात
वार्ताहर/सांबरा
समाजातील प्रत्येक व्यक्तीला ज्ञानाची भूक असते. हंगरगे गावातच ग्रामस्थांना भक्तीभावनेची क्षुधा झालेली आहे. म्हणून तुम्हा सर्वांच्या सहकार्यातून श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. हे मंदिर उभारताना सर्वांची इष्टभक्ती भावना दृढ होत चालली आहे. प्रत्येकाच्या जीवनात भक्तीभावनेची वीट इष्टऊपात ऊजली पाहिजे. प्रत्येकांनी धर्माचरणाने वागले पाहिजे. धर्मयुक्त इष्टभावनेद्वारे इष्ट कार्य घडत असते. त्या इष्टकावर विठ्ठल विराजमान झालेला आहे. धर्माचरणाशिवाय केलेली भक्ती निष्फळ ठरते, असे मौलिक विचार परमाब्धिकार प.पू. परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केले. ते हंगरगे येथे श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहण कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. जय हरी विठ्ठल... जय हरी विठ्ठल, तुकोबा...ज्ञानोबा...जयघोषात हंगरगे येथील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराचा कळसारोहण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांसह पंचक्रोशीतील वारकरी आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भक्तिमय वातावरणात पार पडला.
आडी श्रीदत्त मठाचे प. पू. परमात्मराज महाराजांच्या हस्ते मंदिराच्या गाभाऱ्यात श्री विठ्ठल-रखुमाई मूर्तिची पुन:प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर मंदिराचा कळसारोहण कार्यक्रम पार पडला. तत्पूर्वी फुलांचा वर्षाव करत महाराजांचे स्वागत करण्यात आले. दीपप्रज्वलन माजी खासदार मंगल अंगडी, माजी आमदार संजय पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, विनय कदम, पुंडलिक पावशे, हिरामणी पाटील, उमेश शहापूरकर, महेश रेडेकर, भैरू काटगाळकर, शिवाजी चलवेटकर, सोमनाथ हुंदरे, महेश चलवेटकर आदींच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृष्णा बेळगुंदकर होते. कळस पूजन शिवाजी शहापूरकर, मूर्ती पूजन प्रकाश शहापूरकर, ध्वजपूजन गणपत बेळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्वामींचे पाद्यपूजन मोनापा मुतगेकर आणि जीर्णोद्धार कमिटी सदस्यांनी केले. यावेळी पुंडलिक कुंडेकर यांनी महाराजांचा परिचय करून दिला. तर माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी महाराजांचा सत्कार केला. देणगीदारांच्या सहकार्यातून गावात भव्य मंदिर उभारण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसापासून अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आज मंदिराचे लोकार्पण, महाप्रसाद कार्यक्रम
मंगळवार दि. 11 रोजी दुपारी 12 वाजता महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण होणार आहे. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर कमिटीने केले आहे.