कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कंग्राळी बुद्रुक येथे लक्ष्मी देवीला पालवा-रेडा सोडणे कार्यक्रम भक्तिभावाने

01:12 PM Oct 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भंडाऱ्याच्या उधळणीत देवीचा जयघोष : लक्ष्मीदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कटबंद वार पाळणूक

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक 

Advertisement

श्री लक्ष्मी माता की जय, श्री लक्ष्मी देवीच्या नावानं चांगभल, श्री रेणुका माता की जय या जयघोषात कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी शेवटची कटबंद वार पाळणूक करून ग्रामस्थांच्यावतीने देवीला पालवा व रेडा सोडणे कार्यक्रम भक्तिपूर्ण वातावरणात व भंडाऱ्याच्या उधळणीमध्ये पार पडला. 43 वर्षांनी लक्ष्मीदेवीची यात्रा करण्याचा योग आल्यामुळे गावामध्ये जल्लोषी वातावरण आहे. प्रारंभी गावातील हक्कदार चव्हाण घराण्याच्यावतीने संताजी गल्ली येथून चंदनाचे लाकूड आणण्यासाठी बैलगाडीसह देवस्थान पंच कमिटी व चव्हाण घराण्याचे हक्कदार गेले होते. यावेळी देवीचे पुजारी मोनाप्पा सुतार यांच्या हस्ते चंदनाच्या झाडाचे पूजन करून कुऱ्हाडीने घाव घालून तोडण्यात आले. त्यानंतर संताजी गल्ली येथून चव्हाण घराण्याच्या बैलगाडीतून मिरवणुकीने चंदनाचे झाड आणले. त्यानंतर चव्हाण घराणे भाविकांच्या हस्ते चंदनाच्या झाडाचे पूजन करून देवस्थान पंच कमिटीच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर लाकूड लक्ष्मी देवीच्या गाभाऱ्यात ठेवण्यात आले.

देवीचे विधिवत पूजन 

लक्ष्मी देवी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शेवटचा कटबंद वार व देवीला पालवा व रेडा सोडणे कार्यक्रमाचे औचित साधून ग्रामस्थ, पै पाहुणे मंगळवारी लक्ष्मी मंदिरसमोर  एकवटले होते. यावेळी देवस्थान पंच कमिटी, यात्रा कमिटी, पै पाहुणे व ग्रामस्थ यांच्यावतीने श्री लक्ष्मी देवीचे विधिवत पूजन करण्यात आले.

आंबेडकर गल्ली येथून मिरवणुकीला प्रारंभ 

यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवीला पालवा व रेडा सोडणे परंपरागत हक्कदार आंबेडकर गल्लीतील ग्रामस्थ असल्यामुळे सर्व ग्रामस्थ मंदिरापासून भंडाऱ्याची उधळण करत ढोल ताशांच्या निनादात कलमेश्वर गल्लीतून आंबेडकर गल्लीकडे आल्यानंतर श्री लक्ष्मीदेवीचा रानगा (लांडगा) व आंबेडकर गल्लीतील हक्कदार ग्रामस्थांच्यावतीने पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. सदर पालवा व रेडा हक्कदार व ग्रामस्थांच्यावतीने देवीला अर्पण करण्यात आले. मिरवणूक मसणाई गल्लीतून श्री लक्ष्मी देवीच्या गदगेजवळ आली. तेथे ग्रामस्थांच्यावतीने गाऱ्हाणे घालण्यात आले. प्रत्येक गल्लीमध्ये पालवा व रेडा यांना आरती ओवाळून पूजन केले.

भाविकांकडून अल्पोपाहारची व्यवस्था 

येथील चव्हाटा सर्कलमध्ये मिरवणुकीमध्ये सहभागी भाविकांना अल्पोपाहारची सोय करण्यात आली होती. उपस्थित भाविकांनी प्रसादरूपी अल्पोपाहारचा आस्वाद घेतला. मिरवणूक आंबेडकर गल्ली, मसणाई गल्ली, बाहेर गल्ली, लक्ष्मी गल्ली, नेताजी गल्ली, कलमेश्वर गल्लीतून परत श्री लक्ष्मीमंदिर आवारात आल्यानंतर समस्त ग्रामस्थांच्यावतीने आरती व गाऱ्हाणे घालून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. मिरवणुकीत देवस्थान पंच कमिटी सदस्य ग्रा. पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य, सदस्या, यात्रा कमिटी सदस्य, तरुण युवक मंडळे, महिला मंडळांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article