For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भक्तीला अहंकाराचा वाराही लागू नये

10:41 PM May 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
भक्तीला अहंकाराचा वाराही लागू नये
Advertisement

शिरगांव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी 3 मे 2025 रोजीच्या पहाटे गोव्याला हादरवून सोडणारी, गोव्यासाठी ऐतिहासिक ठरलेली चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये सहा भाविकांचे बळी गेले, तब्बल 100 भाविक जखमी झाले. विविध स्तरांवरील माणसांचा निष्काळजीपणा, बेशिस्त, लोभ, बेपर्वाई यांचा परिपाक म्हणून अशा घटना घडतात. जिथे भक्तिचा ओलावा, सेवाभावाचा आनंदडोह अनुभवावा अशा ठिकाणी अहंकार, उन्माद उफाळून यावा, यापेक्षा दुर्दैव ते कोणते? श्ऱीलईराई मातेचे आम्ही धोंडगण, असे का आम्ही आमच्यात भांडावे, देवीच्या भक्तीत लीन असूनही का आमच्यातील अहंकार उफाळून यावा, का आम्ही आमच्याच धोंडगणांवर दादागिरी करावी? सहा धोंडगणांच्या मृत्यूने जेवढे दु:ख झाले तेवढाच अहंकाराचा क्लेश उभ्या गोव्याला सलत आहे.

Advertisement

शिरगांवच्या चेंगराचेंगरीप्रकरणी गोवा सरकारने महसूल खात्याचे सचिव संदीप जॅकिस यांच्या प्रमुखपदाखाली स्थापन केलेल्या चौकशी समितीने सादर केलेला 100 पानी अहवाल सर्वांच्याच डोळ्यांमध्ये अंजन घालणारा आहे. भाविकांपासून धोंडगण, देवस्थान समिती, पोलिस, प्रशासन, पंचायत मिळून पाच घटक जबाबदार असल्याचे अहवाल सांगतो. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अहवालाची माहिती पत्रकार परिषदेत दिली, परंतु अहवाल जनतेसाठी खुला केलेला नाही. त्यांनी जी माहिती दिली, त्या पाच घटकांकडे व्यापक अर्थाने पाहिल्यास, लोकशाहीच्या दृष्टीने पाहिल्यास शिरगांवातील चेंगराचेंगरीस सरकारच जबाबदार ठरते आहे. हा अहवाल खराच सत्यशोधक असल्याचे मानण्यास हरकत नसावी. दुर्घटनेच्या सर्व सत्यांवर प्रकाशझोत टाकलेला आहे. अत्यंत पद्धतशीरपणे तयार करण्यात आलेल्या या अहवालात चुकीच्या व्यवस्थापनाच्या श्रृंखलेचा परिणाम म्हणजे ही चेंगराचेंगरी होती, हे सत्य समितीने सुस्पष्टपणे उघड करुन दाखविले आहे.

देवीच्या पवित्र तळीकडून होमकुंडाकडे जाणाऱ्या रस्त्याची उतरण हा भाग या दुर्घटनेचा केंद्रबिंदु होता. तेथे भाविकांची प्रचंड गर्दी होती, जिच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते. कहर म्हणजे त्याच ठिकाणी धोंडगणांचे बेशिस्त वर्तन सुरु होते. काही धोंडगण पुढे जाण्यासाठी इतरांवर कुरघोडी करत होते, त्याचवेळी निर्माण झालेल्या धक्काबुक्कीत, गोंधळात एक महिला जमिनीवर पडली. अन्य काहीजण पडले. बाकीचे त्यांना पायाखाली तुडवीत पळाले. रस्त्याच्या दुतर्फा गर्दीचा कोणताही विचार न करता थाटलेल्या बेसुमार स्टॉल्समुळे अगोदरच अरुंद झालेल्या आणि भाविकांच्या गर्दीने भरलेल्या रस्त्यात चेंगराचेंगरी झाली. कोणतीही सीसी टीव्ही यंत्रणा नव्हती, ड्रोनद्वारे टेहळणी होत नव्हती, प्रभावी पोलिस व्यवस्था नव्हती, अशी एकामागूनची अनेक सत्ये जॅकिस समितीने उघड केलेली आहेत. समितीने आपले काम अत्यंत निष्पक्षपणे, कुणाचाही मुलाहिजा न राखता केलेले आहे.

Advertisement

जे आठ सरकारी अधिकारी या दुर्घटनेच्यावेळी निष्क्रीय होते, त्यांना सरकारने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. काहींच्या अगोदरच बदल्या केलेल्या आहेत. ज्या आठ मोठ्या अधिकाऱ्यांवर निष्क्रियतेचा ठपका ठेवण्यात आला आहे, ते पाहता सरकार या चेंगराचेंगरीस कारणीभूत आहे. आपण लोकशाही राजवट मानत असाल तर जॅकिस यांच्या अहवालानुसार सरकारच प्रथम जबाबदार ठरत आहे. कारण, 1. उत्तर गोवा जिल्हाधिकारी, 2. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक, 3. डिचोली उपविभागीय अधिकारी, 4. डिचोली पोलीस अधीक्षक, 5. डिचोलीचे मामलेदार, 6. डिचोलीचे पोलीस निरीक्षक, 7. मोपाचे पोलीस निरीक्षक, 8. शिरगांव ग्रामपंचायतीचे सचिव हे आठजण म्हणजे प्रशासन-सरकारच आहे. अत्यंत महत्त्वाच्या स्तरावरील आणि या जत्रोत्सवाच्यादृष्टीने प्रथम स्तरावरील अधिकारी आहेत हे आठजण. एवढे जबाबदार अधिकारी एवढ्या मोठ्या जत्रोत्सवाबद्दल निष्क्रिय राहतात म्हणजे सरकारच निष्क्रिय नव्हते काय? श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा घोषित करणाऱ्या सरकारचे हेच काय ते या जत्रोत्सवाबद्दलचे गांभीर्य? सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत जेमतेम चार-पाच हजार भाविकांची उपस्थिती असणाऱ्या, ओल्ड गोव्याच्या विस्तीर्ण भागात होणाऱ्या फेस्तासाठी हजारो पोलिसांची तैनाती आणि इतर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येते तसेच शिरगांवात एकाचवेळी दीड ते दोन लाख भाविकांची उपस्थिती असताना प्रथम स्तरावरील सर्व सरकारी अधिकारी निष्क्रिय रहावेत हे काय दर्शविते? फेस्तच महत्त्वाचे? लईराईचा जत्रोत्सव महत्त्वाचा नाही काय? असे प्रश्न उपस्थित होणे साहजिकच नाही काय?

देवी श्रीलईराई देवस्थान समितीच्याही चुका जॅकिस समितीने उघड केलेल्या आहेत. अन्य अनेक देवस्थानांतील जत्रोत्सवांमध्ये या चुका काही अपवाद वगळून दिसत असतात. जत्रोत्सवातील दुकानांबाबत विचार करण्याची वेळ आलेली आहे. पूर्वीच्याकाळी सर्व वस्तु गावातल्या दुकानांवर मिळत नव्हत्या, म्हणून वर्षांतून एकदा होणाऱ्या जत्रोत्सवात त्या मिळाव्यात, या हेतुने जत्रोत्सवात दुकाने थाटली जायची. आता

‘ऑन लाईन’च्या ‘होम डिलिवरी’च्या जमान्यात या दुकानांची काहीही गरज राहिलेली नाही. पारंपरिक चणे, खाजे, देवाचे सामान, फुले-फळे-ओटीचे सामान, चहा-फराळ अशी मोजकीच दुकाने असावीत. अधिकाधिक जागा दुकानांनी व्यापण्यापेक्षा हजारो दुचाकी, कार अन्य वाहनांना पुरेशा वाहनतळांची व्यवस्था करणे अधिक महत्त्वाचे आहे. देवस्थानांना उत्पन्न असतानाही अशा दुकानांपासून मिळणाऱ्या पैशांचा, जुगार-पटवाल्यांकडून मिळणाऱ्या पैशांचा लोभ का धरावा? एखादी दुर्घटना होण्यास ही परिस्थिती निमंत्रण देणारी असते. देवी लईराईचा जत्रोत्सव गोव्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. लाखो भाविक जत्रेच्या दिवशी शिरगांवात येतात. लईराईचे धोंडगण हे या जत्रोत्सवाचे वैशिष्ट्या आहे. देवी लईराई अग्निदिव्य करते आणि नंतर व्रतस्थ धोंडगणही अग्निदिव्य करतात, हा अपार भक्तीचा अनुपमेय दिव्य सोहळा आजच्या आधुनिक काळात शाश्वत, चिरंतन सत्याचा आविष्कार आहे. देवी लईराईचे महात्म्य भक्तीने श्रवण करण्याचे आहे. अशा या दैवी चमत्काराला गालबोट लागावे, हे वेदनादायी आहे. झालेल्या दुर्घनेतून सर्वांनीच बोध घ्यायचा आहे. येत्या वर्षभरात सरकार मृतांना प्रत्येकी 10 लाख रुपये देईल. प्रशासन व्यवस्थेत सुधारणा करील. सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करील. रस्ते व इतर सुविधा निर्माण करील. पण धोंडगणांच्या वर्तनाबद्दल सरकार काय करणार? देवदेवतांच्या भेटीच्याप्रसंगीही आपल्यातील जात, पद, पैसा, प्रतिष्ठा याबद्दलचा अहंकार गळून पडत नाही. जातपात, मानपानांवरुन आम्ही कुरघोडी करुन पुढे जाऊ पाहतो. या अहंकारातून होतेय धक्काबुक्की आणि त्यातून होतेय चेंगराचेंगरी. म्हणून चला, देवी लईराई मातेकडे आपल्यासाठी सर्वकाही मागुया आणि त्याचबरोबर आम्हाला अहंकाराचा वाराही लागू देऊ नकोस, अशी विनवणीही करुया.

राजू भिकारो नाईक

Advertisement
Tags :

.