कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भक्तलक्षणे 2

06:30 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

बाप्पांना प्रिय असलेल्या भक्ताची लक्षणे बाप्पा सांगत आहेत. अशी लक्षणे जर कुणात दिसू लागली तर तो बाप्पांना प्रिय आहे असं समजायला हरकत नाही. अर्थात ही अलौकिक म्हणजे दैवी लक्षणे प्रयत्न करून प्राप्त होणारी नाहीत. त्यासाठी ईश्वराच्या कृपेचा वर्षाव होणं आवश्यक आहे आणि तो केवळ अनन्य भक्तीमुळंच होत असतो. ही लक्षणे किंवा त्यातून प्रकट होणारे गुण सामान्य नसल्याने त्यांना भगवद्गीतेच्या सोळाव्या अध्यायात दैवी संपत्ती असं भगवंतांनी म्हंटलेलं आहे.

Advertisement

निरहंममताबुद्धिरद्वेषऽ शरणऽ समऽ । लाभालाभे सुखे दु:खे मानामाने स मे प्रियऽ ।।15।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार अहंकार व ममत्वबुद्धी यांनी विरहित असलेला, द्वेषरहित, करुण, लाभ-अलाभ, सुख-दु:ख व मान-अपमान यांचे ठिकाण जो सम असेल तो बाप्पांना प्रिय आहे. बाप्पा त्यांना प्रिय असलेल्या भक्ताच्या लक्षणांबद्दल बोलतायत. अहंकार विरहित असणे हा भक्ताचा पहिला गुण आहे. माणसाला स्वत:च्या सामर्थ्याचा फार अहंकार असतो पण जो अहंकारविरहीत असतो त्याला ईश्वर आपल्याकडून काम करून घेत आहेत ह्याची खात्री असते. पुढील गुण ममतारहित असा आहे. एखाद्या गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दलची ममता मालकी भावनेतून निर्माण होते. माझे घर, माझी गाडी, माझी मुले इत्यादि. ही यादी बरीच लांबू शकते. आपल्याला प्राप्त झालेल्या सर्व गोष्टी ईश्वराच्या मालकीच्या आहेत आणि त्याने त्याच्या मर्जीनुसार आपल्याला काही काळ वापरायला दिलेल्या आहेत ही वस्तुस्थिती लक्षात न घेतल्याने त्या वस्तू व व्यक्तींबद्दल मनुष्य ममता बाळगत असतो आणि त्याचा बदल्यात त्यांच्याकडून अपेक्षा ठेवतो व सुखदु:खाचा धनी होऊन नवीन प्रारब्ध तयार करतो. त्यामुळे संसार बंधनात अडकतो. ज्याला वस्तुस्थितीची जाणीव असते तो आपोआपच ममतारहीत होतो. सर्वांना जे जे काही प्राप्त झालेलं आहे ते मुळात ईश्वराचं आहे अशी भक्ताची खात्री असल्याने मला कमी तुला जास्त असं त्याला कधीच वाटत नसल्याने तो कुणाचाही द्वेष करत नाही.

सर्वसाधारणपणे करुणा आणि दया हे दोन्ही शब्द समानार्थी म्हणून वापरले जातात पण या दोन्हीत फरक असा आहे की, करुणा मन:स्थितीजन्य आहे तर दया परिस्थितीजन्य आहे. करुणेचे वास्तव्य हृदयात असते. परिस्थितीशी तिचा काही संबंध नसतो. उदाहरणार्थ एखाद्या फुलाचा वास चोहीकडे दरवळत असतो मग आसपास कुणी असो वा नसो त्यात फरक पडत नाही. ज्याच्या अंत:करणात करुणा नसते त्याच्या हृदयात परिस्थितीच्या दबावाने दया उत्पन्न होते. त्यामुळे ती प्रत्येकवेळी एकसारखी असेलच असे नाही. उदाहरणार्थ पहिल्या भिकाऱ्याला पैसे दिल्यावर दुसऱ्याला पैसे दिले जातातच असं नाही किंवा एकाला मदत केल्यावर दुसऱ्याला मदत केली जाईलच असं नाही. म्हणजे यात परिस्थितीनुसार आपला परका बघून भेद केला जातो. करुणेचं तसं नसतं. तिथं सर्वांना सारखीच वर्तणूक मिळते. एका भक्तावर कृपा केल्यावर, पुढल्या भक्तावर किंवा त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक भक्तावर त्याच्या भक्तीच्या प्रमाणात देव कृपा करतच असतात म्हणून त्यांना करुणेचा सागर असलेले म्हणतात. जो अहंकारविरहीत असतो त्याच्याच हृदयातून करुणा पाझरत असते

एखादी गोष्ट मिळणं किंवा न मिळणं ह्या दोन्ही परिस्थितीत सुख किंवा दु:ख न मानणे हे भक्ताचं पुढचं लक्षण आहे. यासाठी ईश्वरावर अतूट विश्वास असणं आवश्यक आहे. तो जे करतोय, देतोय किंवा देत नाही हे आपल्या हिताचंच आहे अशी पूर्ण खात्री ज्याला आहे त्यालाच हे शक्य होतं व त्याच्यात सुखदु:ख एकसारखंच मानणं हे लक्षण आपोआप येतं. भक्ताला स्वत:च्या शरीराविषयी, संपत्तीविषयी प्रेम व अहंकार दोन्ही वाटत नसल्याने त्याला मान अपमान एकसारखेच असतात.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article