Panadharpur : विठुरायाच्या दर्शनाने तृप्त झालेले भाविक परतीच्या वाटेवर
कार्तिकी एकादशी वारीनंतर भाविकांचा परतीचा प्रवास
पंढरपूर : कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह विविध राज्यांतून आलेल्या भाविकांनी पंढरीचा निरोप घेतला. मंगळवारी बस आणि रेल्वे स्थानकांवर भाविकांनी गावी जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. विठ्ठल-रुक्मिणीचे मनोभावे दर्शन झाल्यानंतर 'जातो माघारी पंढरीनाथा, तुझे दर्शन झाले आता' अशी भावना व्यक्त करत जड अंतःकरणाने अनेक भाविकांनी परतीची वाट धरली.
रविवारी कार्तिकी एकादशीचा अनुपम्य सोहळा भक्तिभावात झाला. एकादशीच्या दिवशी दर्शन रांगेतून लाखो भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे पदस्पर्श दर्शन घेतले. अनेक भाविकांचा एकादशी दिवशीच रात्री परतीचा प्रवास भाविकांनी देवाचे मुखदर्शन घेतले.
गर्दीमुळे बहुतांश भाविकांनी चंद्रभागेचे स्नान करून संत नामदेव पायरीपासूनच सावळ्या विठुरायाचे आणि मंदिरावरील कळस दर्शन घेऊन बारी पूर्ण केली. त्यानंतर सोमवारी द्वादशी सोडून भाविकांनी पंढरी सोडली. परतीच्या प्रवासाला जाण्यासाठी येथील नवीन बसस्थानक, चंद्रभागा बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर भाविकांची गर्दी होती. खासगी वाहनाने आलेल्या भाविकांनी एकादशीच्या दिवशीच रात्री उशीरा परतीचा प्रवास सुरू केला. यंदाच्या वर्षी रेल्वे प्रशासनाने भाविकांसाठी विविध रेल्वे स्थानकावरून जादा गाड्या सोडण्याची व्यवस्था केली. होती.
रेल्वे प्रवास हा सुखकर आणि आरामदायक असल्याने हजारो भाविक रेल्वेने दाखल झाले होते. कलबुर्गी-कोल्हापूर एक्सप्रेसमुळे कोल्हापूर, कोकण, कर्नाटक तसेच गोवा येथून भाविक पंढरीत आले होते. या वारीत ३३ फेऱ्या करून रेल्वेने कार्तिकी वारीसाठी सहकार्य केले.