राज्यातील जोतिबाचे भाविक कोल्हापुरात दाखल
कोल्हापूर :
दख्खनचा राजा जोतिबाचे पाचही खेटे पूर्ण झाले की महाराष्ट्रवासियांना ओढ लागून राहणारी वाडीरत्नागिरीवर जोतिबाची चैत्रयात्रा शनिवारी 12 एप्रिलला साजरी होत आहे. महाराष्ट्राच्या विविध जिह्यातील भाविक जोतिबाच्या ओढीने कोल्हापूरात दाखल होत आहे. अनेक भाविक आपली परंपरा अबाधित ठेवत बैलगाडीनेही येत आहेत. आधी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन सारे थेट विसावा घेण्यासाठी पंचगंगा नदी घाटावर दाखल होत आहेत.
वाडीरत्नागिरीवर चार दिवसांचा मुक्काम करण्याच्या तयारीने भाविक येत असतात. यंदाच्या चैत्रयात्रेसाठीही राज्यभरातून भाविक कोल्हापूरात दाखल होऊ लागले आहेत. यामध्ये अनेक भाविक चक्क बैलगाडीने येताना दिसत आहेत. मंगळवारी दिवसभरात तर सातारा, चाकण (पुणे), सोलापूर, माढा, बार्शी, पंढरपूर, तुळजापूर, इंदापूर, मंगळवेढा, करमाळा, टेंभूर्णी, धाराशिव, लातूर, आंबेजोगाई येथील भाविक कोल्हापुरात आले होते. यापैकी अनेकांनी आधी अंबाबाईचे दर्शन घेऊन वाडीरत्नागिरीवरील जोतिबाच्या चैत्रयात्रेला जाण्यासाठी पंचगंगा नदी घाटाकडे प्रयाण केले. चालताना पावलो-पावली त्यांच्या मुखातून जोतिबाच्या नावानं चांगभलंचा अखंड गजर होऊ लागला होता.
चांगभलंच्या गजरातच पंचगंगा नदी घाटावर दाखल होणारे अनेक भाविक नदी पात्रात स्नान करत आहेत. नंतर सोबत आणलेल्या वस्त्रावर जोतिबाचा टाक ठेवून त्याला जलाभिषेक करत गुलालही अर्पण करताहेत. नदी घाटावरच एकत्र बसून न्हाहरीवर तावही मारत आहेत. नदी घाटावरील झाडांच्या सावलीखाली थोडा विसावाही घेत आहेत. या विसाव्यातून ताजेतवाने होऊन भाविक पुन्हा चांगभलंचा गजर करत शिवाजी पुलमार्गे वाडीरत्नागिरीच्या दिशेने पाऊले टाकत आहेत. त्यामुळे कोल्हापूर-जोतिबा मार्गावर भाविकांचे एका मागून एक असे जथ्ये दिसू लागले आहेत.
- 150 एसटी बसेसची व्यवस्था...
राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाकडून वाडीरत्नागिरीकडे भाविकांना घेऊन जाण्यासाठी 150 एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली. शुक्रवार 11 रोजीपासून पंचगंगा नदीघाटावर स्वतंत्रपणे तयार केलेल्या थांब्याजवळून सर्व एसटी बसेस वाडीरत्नागिरीकडे सोडल्या जाणार आहेत. थांब्यावऊन प्रत्येक पंधरा मिनिटाला एक एसटी बस वाडीरत्नागिरीकडे सोडण्याचे नियोजन केले असल्याचे कोल्हापूर विभागातील सुत्रांनी सांगितले.
- आज आणि उद्यापासून सासनकाठ्या कोल्हापूरात दाखल होणार...
वाडीरत्नागिरीवरील चैत्रयात्रेसाठी गुऊवार 10 रोजीपासून एक-एक सासनकाठी व तिच्या सोबतच्या शेकडो भाविकांचे जथ्ये हलगीच्या ठेक्यावर कोल्हापुरात दाखल होण्यास सुऊ होईल. सासनकाठ्यांच्या आगमनाने कोल्हापुरातही खऱ्या अर्थाने चैत्रयात्रेचा मोहोल तयार करण्यासही होईल. बहुतांश सासनकाठ्या आधी पंचगंगा नदी घाटावर नाचवत आणल्या जातील. नदीपात्रातील पाण्याने सासनकाठी व त्यावरील जोतिबाच्या टाकाला जलाभिषेक केला जाईल. सासनकाठीसोबत थोडा विसावा घेऊन मगच वाडीरत्नागिरीकडे प्रस्थान केले जाईल.