For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओडिशामध्ये भाविकांची मागणी पूर्ण

07:00 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओडिशामध्ये भाविकांची मागणी पूर्ण
Advertisement

पुरी येथील जगन्नाथ मंदिराची सर्व द्वारं खुली : कोरोनाकाळापासून 3 द्वारं होती बंद

Advertisement

वृत्तसंस्था /पुरी

ओडिशाच्या पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या चारही द्वारांना गुरुवारी सकाळी आरतीदरम्यान भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. यादरम्यान राज्याचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्यासोबत त्यांचे मंत्रिमंडळ, पुरीचे खासदार संबित पात्रा आणि बालासोरचे खासदार प्रतापचंद्र सारंगी उपस्थित होते. चारही द्वार खुले झाल्यावर या सर्व नेत्यांनी मंदिराची परिक्रमा केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत जगन्नाथ मंदिराच्या चारही द्वारांना खुले करण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव बुधवारी संमत झाला आणि गुरुवारी सकाळी 6.30 वाजता सर्व द्वारे खुले करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री माझी यांनी दिली आहे. तसेच मंदिरविकासासाठी 500 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कोरोना संकटकाळात तत्कालीन मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकारने मंदिराचे अश्वद्वार (उत्तर द्वार), व्याघ्र द्वार (पश्चिम द्वार) आणि हस्ति द्वार (दक्षिण द्वार) बंद करण्याचा आदेश दिला होता. केवळ सिंह द्वार खुले होते, जेथून भाविक मंदिरात ये-जा करत होते. यामुळे मंदिरात मोठी गर्दी आणि लांब रांगा दिसून येत होत्या. भाविक दीर्घकाळापासून सर्व द्वारं खुली करण्याची मागणी करत होते.

Advertisement

मंदिराच्या देखरेखीसाठी 500 कोटी

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जगन्नाथ मंदिराच्या देखभालीसाठी 500 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन पटनायक सरकारने यापूर्वी जगन्नाथ कॉरिडॉर प्रकल्प हाती घेतला होता. नव्याने सत्तेवर आलेले भाजप सरकार देखील हा प्रकल्प सुरूच ठेवणार असल्याचे मानले जात आहे.

शेतकऱ्यांसाठी योजना

मुख्यमंत्री माझी यांनी राज्य सरकार तांदळाला 3100 प्रति क्विंटल इतका हमीभाव देण्यासाठी पावले उचलणार असल्याचे सांगत संबंधित विभागाला यासंबंधी काम करण्याचा निर्देश दिल्याची माहिती दिली. राज्य सरकार लवकरच याकरता समिती स्थापन करणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी समृद्ध कृषक धोरण योजना तयार केली जाणार आहे. यासंबंधी रोडमॅप तयार करत तो राज्य सरकारसमोर सादर करण्याचा निर्देश सर्व विभागांना देण्यात आला आहे. ही योजना 100 दिवसांच्या आत लागू करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.

सुभद्रा योजना लागू करणार

महिला सशक्तीकरण आणि बाल कल्याणासाठी बीजू जनता दलाच्या सरकारचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. याचमुळे नवे सरकार 100 दिवसांच्या आत सुभद्रा योजना लागू करण्यात येईल, याच्या अंतर्गत महिलांना 50 हजार रुपयांचे कॅश व्हाउचर दिले जातील असे मुख्यमंत्री माझी यांनी सांगितले आहे.

भाजपच्या घोषणापत्रातील मुद्दा

जगन्नाथ मंदिराच्या चारही द्वारांना खुले करण्याचे आश्वासन भाजपने प्रचारादरम्यान दिले होते, विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्यावर मोहन चरण माझी यांनी राज्यात भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून बुधवारी शपथ घेतली होती. माझी यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री कनक वर्धन सिंह देव आणि प्रभाती परिदा यांनीही शपथ घेतली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली आणि जगन्नाथ मंदिराची सर्व द्वारं खुली करण्याचा आदेश दिला.

Advertisement
Tags :

.