For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोव्याच्या कानाकोपऱ्यात निनादतो मनोहारी घुमटगाज

12:19 PM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
गोव्याच्या कानाकोपऱ्यात निनादतो मनोहारी घुमटगाज
Advertisement

पुरुष, महिला, बाल रंगले घुमटनादात : प्राचीन कलेचे नव्या पिढीकडून संवर्धन

Advertisement

दुर्गाकुमार श्रीकृष्ण नावती/पणजी

सध्या गोव्यातील गणेश चतुर्थीच्या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांना उधाण आलेलं आहे. ऐन गणेश चतुर्थीच्या या काळात गोव्यातील प्रत्येक गावात, सार्वजनिक गणेश मंडळांच्या मांडवात, श्री गणेश संबंधित मंदिरांमध्ये आणि वाड्यावाड्यावर घुमट आरती वादनामध्ये दंग होऊन रमणारे भक्तजन दृष्टीस पडतात. घराघरात पार पडणाऱ्या गणेशोत्सवामध्ये श्रींच्या आरतीच्या वेळी सगळीकडे घुमट वादन जल्लोषात सादर होत असते, ज्यामध्ये अबाल वृद्ध आणि तऊण घुमटविवश अवस्थेत कैफ चढल्यागत वावरताना दिसतात. आपल्या घुमट कलेतून श्रींच्या आरत्यामध्ये रंग भरणारे हे कलाकार गोमंतकीय संस्कृतीचे संवर्धक आहेत.

Advertisement

घुमट वादनासाठी घुमटाव्यतिरिक्त समेळ, कासाळे ही वाद्ये वापरली जातात. परंतु ताल रक्षणाची जबाबदारी घुमट वादकच पार पडत असतो.  घुमट वादनात मुळात मर्यादित तीनच बोलांचा वापर व्हायचा, परंतु आजच्या घुमट वादकांनी आरती वादनाला समर्पक अशा एक-दोन अन्य  बोलांची निर्मिती आपल्या कल्पक बुद्धिमत्तेतून केलेली आहे. मुळात घुमट हे गोमंतकीय वाद्य असल्याचे मत जाणकार मांडतात. परंतु हे वाद्य गोमंतकीय नसून त्याचा संबंध इतरत्र जोडणारे काही चिकित्सक लोकही गोव्यात आहेत. त्यामुळे हा विषय चर्चेचा आहे. मात्र घुमटाचे पेटंट मिळवण्यासाठी स्थानिक संस्कृती आणि कलाक्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आग्रही असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे आणि त्यादृष्टीने  प्रयत्नही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

पुरातन काळापासूनचे वादन

‘घुमट वादन’ ही गोव्याच्या मातीच्या सुगंधाने भारलेली कला आहे. गोव्यात पुरातन काळापासून घुमट वादन अस्तित्वात आहे. कुटुंबात मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या नामकरण सोहळ्यानिमित्त ‘सटी’  हा संपूर्ण रात्र जागवण्याचा पारंपरिक आणि धार्मिक रिवाज गोव्यातील हिंदू समाजामध्ये व्हायचा तोही ‘सुवारी’ नामक घुमट वादन प्रकाराच्या माध्यमातून. या पारंपरिक वादन कलेला शास्त्र आहे. तंत्र आहे. नियम आहेत आणि दंडकही आहेत. लिखित स्वरूपात घुमट वादनाविषयीची निदान टिपणे उपलब्ध नव्हती अशावेळी एका समूहाकडून दुसऱ्या समूहाकडे मौखिक आणि अनुकरणीय पद्धतीने हस्तांतरित होऊन ही कला विस्तारली. घुमट या चर्मवाद्याबाबत विस्तृत माहिती देणारा दस्तऐवज किंवा शैक्षणिकदृष्ट्या मार्गदर्शन घडवेल अशी पुस्तके आणि संग्रह सद्यस्थितीत अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहेत, हेही नसे थोडके.

पुरुष, महिला, बालांचा सहभाग

सध्या गोव्यात पुऊष, महिला आणि बाल अशा तिन्ही विभागात घुमट आरतींचे सादरीकरण करणारे कुशल कलाकार आहेत. गोव्यात चातुर्मास काळात घुमटारतींच्या शेकडो स्पर्धा आयोजित होत असतात. शासकीय पातळीवर, शाळा, विद्यालयात तसेच सार्वजनिक ठिकाणी घुमट वादनाच्या स्पर्धा सर्रासपणे पार पडतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घुमटावरील आरत्या सादर करणारी पथके सहभागी होत असतात.

घुमटवादनाचा व्यापक विस्तार

एक काळ असा होता की घुमट आरती हा प्रकार चतुर्थीच्या सणापुरताच मर्यादित असायचा. मात्र राज्यव्यापी घुमट आरती स्पर्धांच्या आयोजनामुळे घुमट वादनाचा हा प्रकार सार्वकालीन झाला. ‘सुवारी’ हा घुमट वादनाचा प्रकार आज इतिहास जमा झालेला आहे. सुवारीमधील फाग, चंद्रावळ, खाणपद आदी प्रकार लुप्त झालेले आहेत, तर ‘मोनी चाल’ हा प्रकार सोडल्यास इतर प्रकार दुर्मिळ झालेले आहेत. कारण सुवारी वादनाला आवश्यक असलेले लिखित स्वरूपातील दस्तऐवज आज उपलब्ध नाहीत. मात्र घुमटाचा पारंपरिक बाज जाणणारे बरेच कलाकार गोव्यातील ग्रामीण भागात आहेत. पारंपरिक पद्धतीने त्यांचा वसा उचललेल्या काही उत्साही आणि होतकरू कलाकारांनी ही कला आगामी पिढीच्या स्वाधीन केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

 विविध तालांचा स्वच्छंद वापर 

गोमंतकीय घुमट आरती हा प्रकार तालांच्या बाबतीतही मर्यादित होता. फक्त संत रचित आरत्या सुऊवातीच्या काळात गायल्या जायच्या. सध्या आधुनिक तालशास्त्राचा जबरदस्त पगडा घुमट वादन कलेवर जाणवतो. त्यामुळे केवळ संताच्याच नव्हे, तर सामान्य रचनाकारांच्या आरत्याही घुमट कलाकार प्राधान्यक्रमाने सादर करतात. ज्यामध्ये त्रिताल, धुमाळी, दीपचंदी आणि केरवा व्यतिरिक्त झपताल, एकताल, रूपक, चौताल, पंजाबी, धमार अशा विविध तालांचा स्वैर वापर घुमटांच्या वादनात केला जातो.

 घोरपडीच्या कातडीचे घुमट

घुमटासाठी घोरपडीचे कातडे वापरले जायचे. घोरपडीच्या कातड्यांच्या आवरणामुळे घुमटांचा नाद प्रभावी वाटायचा. मनोहारी नादोत्पत्ती घोरपडीच्या कातडीच्या आवरणामुळे निर्माण व्हायची. सध्या पर्यावरण संवर्धनाच्या कारणातस्व घोरपडीचे कातडे वापरले जात नाही. अर्थातच ते योग्यही वाटते. त्यामुळे बकरीचे कातडे किंवा सिंथेटिक आवरण घुमटाच्या जडणघडणीसाठी वापरले जाते. त्यामुळे किंचित नादाच्या रसप्रक्रियेत फरक पडत असल्याचे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :

.