For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस

07:10 AM Dec 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस
Advertisement

उपमुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे, अजित पवार शपथबद्ध :  सोहळ्याला दिग्गज नेत्यांची उपस्थिती

Advertisement

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर 2024 रोजी लागला. 4 डिसेंबरपर्यंत असलेली शपथविधीची संदिग्धता संपुष्टात आली. अखेर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मी देवेंद्र सरिता गंगाधर फडणवीस महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून आझाद मैदानात हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी ते बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधी सोहळ्याला महायुतीचे राज्यभरातील समर्थक, कार्यकर्त्यांसह सिनेसृष्टीमधील दिग्गजांनी हजेरी लावली. शपथविधी सोहळ्याला पहिल्या रांगेत अंबानी कुटुंबीय, देवेंद्र फडणवीस यांचे कुटुंबीय, पफथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अंबादास दानवे, निलम गोऱ्हे, नारायण राणे, उदयनराजे भोसले, राम नाईक यांच्यासाठी आसन व्यवस्था होती, तर दुसऱ्या रांगेत मर्चंट कुटुंबीय, कुमार बिर्ला, अजय पिरामल, उदय कोटक, शाहऊख खान, सलमान खान, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, दिलीप संघवी, अनिल अंबानी, रणबीर कपूर, रणवीर सिंह, गीतांजली किर्लोस्कर, बिरेंद्र सराफ, अनिल काकोडकर यांच्यासाठी खास आसन व्यवस्था ठेवण्यात आली होती.

देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान

Advertisement

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 236 जागांवर विजय मिळवला. भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. महायुतीच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. 2014-2019 या कालावधीत त्यांनी पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवले. 2019 मध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचे ते 72 तासांसाठी मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत.

मंत्रालयात स्वागत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथविधीनंतर मंत्रालय परिसरात प्रवेश करताच मंत्रालयीन महिला कर्मचाऱ्यांकडून त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तिन्ही नेत्यांनी मंत्रालयातील महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या फाईलवर केली. पुणे येथील ऊग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी फाईलवर दिले आहेत. चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.

मविआच्या बड्या नेत्यांची सोहळ्याकडे पाठ

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडला आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी मविआच्या बड्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. मात्र, शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शपथविधी सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला. मविआचे बडे नेतेदेखील शपथविधीला हजर राहिले नाहीत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते.

राजकीय नेत्यांची मांदियाळी

शपथविधी समारंभाला देशभरातील भाजप तसेच मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. नितीश कुमार, जे. पी. न•ा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, शिवराजसिंग चौहान, हरीभाऊ बागडे, नितीन गडकरी, निर्मला सीतारामन, रामदास आठवले, पियुष गोयल, भूपेंद्र यादव, विजय ऊपाणी, धमेंद्र प्रधान, मोहन यादव, भजनलाल शर्मा, ज्योतिरादित्य सिंधिया असे दिग्गज नेते उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांची शपथ लक्षवेधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे यांनी त्याला बगल देत शपथ घेतली. त्यांनी सुऊवातीलाच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, मार्गदर्शक आनंद दिघे यांच्या स्मफतीला वंदन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्रीय गफहमंत्री अमित शहा यांना धन्यवाद देत राज्यातील 13 कोटी जनतेला वंदन करून एकनाथ शिंदे यांनी नंतर शिरस्त्याप्रमाणे शपथ घेतली.

विशेष अधिवेशन

शपथविधी झाल्याबरोबर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन 7 डिसेंबर रोजी बोलावण्यात आले आहे. हे अधिवेशन तीन दिवस चालणार आहे. या अधिवेशनात विधानसभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल आणि 9 डिसेंबर रोजी राज्यपालांचे अभिभाषण अधिवेशन होणार आहे.  याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांना पाठविण्यात आला आहे. जागा कमी आणि अपेक्षा जास्त अशी या मंत्रिमंडळाची अवस्था होणार आहे. मात्र हा पेच कसा सुटणार असा प्रश्न केला असताना, मंत्रिमंडळाचे स्ट्रक्चर तयार आहे. सर्वांना मान्य होईल असे मंत्रिमंडळाचे वाटप करण्यात येईल. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल, असे मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.