Mahayuti Govt: महायुतीतील वाचाळवीरांना नारळ मिळणार?, आता नव्या चेहऱ्यांना संधी?
आमदारांच्या बेताल वर्तनामुळे सरकारची प्रतिमा खराब होत आहे
By : प्रवीण काळे
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची चर्चा जोरात आहे. महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मंत्री आणि आमदारांच्या बेताल वर्तनामुळे सरकारची प्रतिमा खराब होत आहे.
त्यात भाजपमधले देखील काही वाचाळवीर आहेत. शहा यांच्या भेटीनंतर मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना नारळ मिळणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे. तसेच काही नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. त्यामुळे कोणाला खुर्ची आणि कोणाला मिर्ची मिळणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
डिसेंबर 2024 ला राज्यात बहुमत असलेले भाजप -शिवसेना -राष्ट्रवादी महायुतीचे सरकार सत्तेवर आले. सत्तेवर येण्यापूर्वी मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदा बरोबरच खातेवाटपाचा तिढा, सत्तेत आल्यानंतर पालकमंत्री पदाचा तिढा, आता 6 महिन्यांनंतर कोणाला डच्चू द्यायचा हा तिढा सरकारसमोर आहे.
त्यामुळे सरकारकडे कधी नव्हे ते हुकमी बहुमत असताना देखील कोणता ना कोणता तिढा हा सरकारसमोर कायम असलेला पहायला मिळतो. पावसाळी अधिवेशनात मंत्री आणि आमदारांच्या बेताल वागण्यामुळे सरकारची प्रतिमा चांगलीच मलीन झाली. यावर स्वत: मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करताना सगळे आमदार माजले असल्याची जनता बाहेर बोलत असल्याचे वक्तव्य केले.
अधिवेशनातील राड्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने असलेला डान्सबारचा मुद्दा चांगलाच गाजला. या दोन्ही मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचा दावा केल्याने एकच खळबळ उडाली.
दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मंत्रिमंडळातील कटी पतंग कोण? याबाबतची उत्सुकता वाढली आहे. शिंदे शिवसेना गटातील मंत्री संजय शिरसाट आणि योगेश कदम, राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे, भाजपचे जयकुमार गोरे यांच्यासह काही मंत्र्यांवर टांगती तलवार कायम आहे.
महायुती सरकारमधील तीन पक्षांमध्ये एकमेकांना टार्गेट करण्याची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे कधी कोणाचा गेम कुठून होईल हे सांगता येत नाही.राज्यात विरोधीपक्ष निष्प्रभ आहे. विधानसभेत विरोधीपक्ष नेता नसताना सरकारमधील मंत्र्यांची एकामागून एक प्रकरणे बाहेर येणे म्हणजे सरकारमधीलच तीन पक्षांमध्ये शह काटशहचा खेळ सुरू आहे.
रोज एक नवीन राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेले आहे की, आता त्या मंत्र्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील कधी काय बाहेर र्यईल, हे सांगू शकत नाही. राजकारणात केलेल्या चुका एकवेळ माफ होतात,पण मलीन झालेली प्रतिमा काही लवकर धुतली जात नाही.
सरकारमधील तीन पक्षांमध्ये ज्या पध्दतीने एकमेकांची प्यादी मारण्यासाठी डाव रचले जात आहेत, ते बघता भविष्यात खूप भयानक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मुलीचे मार्क वाढविल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर, जावयासाठी जमिनीचे आरक्षण बदलल्या प्रकरणी मुख्यमंत्री मनोहर जोशी, काळवीट शिकारप्रकरणी धर्मराव आत्राम यांना आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे द्यावे लागले होते. हे राजीनामे केवळ पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी झाले. तसे भ्रष्टाचारामुळे तर अनेकांचे राजीनामे झाले आहेत.
मुनगंटीवारांचे पुनर्वसन की राहुल नार्वेकरांना शिक्षा
भापजचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या जागी मुनगंटीवार यांची वर्णी लागली जाण्याची तर नार्वेकर यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. नार्वेकर यांच्यावर सातत्याने पक्षपातीपणा तसेच लक्षवेधी लावण्यावऊन केलेले आरोप, त्यामुळे त्यांना ही शिक्षा असणार का, हा प्रश्न आहे.
योगेश कदमांची कामगिरी प्रभावी
पावसाळी अधिवेशनात शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी उदय सामंत, प्रकाश आबिटकर आणि योगेश कदम यांची कामगिरी प्रभावी ठरली. कदम यांनी गृहखात्याबरोबर इतर खात्याची चांगली उत्तरे दिली. मात्र आईच्या नावावर असलेल्या डान्सबार प्रकरणी विरोधकांनी चांगली कोंडी केली आहे. कदम यांना हे प्रकरण भोवण्याची शक्यता आहे.
नव्या चेहऱ्यांबाबत उत्सुकता
मंत्रिमंडळात फेरबदल झाल्यास सध्याची परिस्थिती बघता नव्या चेहऱ्यांना संधी देताना शिवसेनेसमोर सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे. शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.