For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संपर्क रस्त्यांच्या विकासामुळे ग्रामीण जनतेला लाभ

10:13 AM Mar 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
संपर्क रस्त्यांच्या विकासामुळे ग्रामीण जनतेला लाभ
Advertisement

सर्वच खेडी एकमेकांशी जोडली गेल्यामुळे पै पाहुण्यांची सोय : शेती व्यवसायाशी संबंधित वाहतूक समस्या सुटण्यासही मदत, इतर रस्त्यांचा विकास होणेही गरजेचे

Advertisement

वार्ताहर /कडोली

कडोली परिसरात संपर्क रस्त्यांच्या विकासामुळे सर्वच खेडी एकमेकांशी जोडली गेली आहेत. यामुळे पै पाहुण्यांच्या सोयींबरोबर शेती व्यवसायाशी संबंधित वाहतूक व्यवस्थेची समस्या सुटण्यासही फार मोठी मदत झाली आहे. गेल्या 5 ते 10 वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर ग्रामीण भागात विशेष करून कडोली परिसरात एकमेकांशी जोडणाऱ्या खेड्यांच्या संपर्क रस्त्यांचा विकास झाला नव्हता. त्यामुळे खेडोपाडी असलेल्या पै पाहुण्यांचा संपर्कही होत नव्हता. पै पाहुण्यांना भेटायचे असेल तर प्रथमत: बेळगावला जाऊन त्यानंतर संबंधित खेड्याला जावे लागत होते. प्रत्येक खेड्याचा संपर्क केवळ बेळगावशी जोडला गेला होता. बेळगावशी जोडणाऱ्या रस्त्यांचा केवळ विकास झाला होता. एखाद्या खेड्याला जायचे असेल तर प्रवासही जादा होत होता आणि नादुरुस्त रस्त्यांमुळे मोठ्या समस्या निर्माण होत होत्या. तेव्हा पै पाहुण्यांच्या घरी जाऊन आमंत्रण देणे किंवा भेटून येणेदेखील तितकेच अवघड जात होते.आता गेल्या 5-10 वर्षांत कडोली परिसरात संपर्क रस्त्यांच्या विकासात मोठी क्रांती झाली आहे. यमकनमर्डी मतदारसंघात विकासाचा महामेरू म्हणून परिचित असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच या भागाचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी कडोली परिसरातील सर्वच खेडी एकमेकांशी जोडली जावीत आणि या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने येथील सर्व संपर्क रस्त्यांचा विकास केला. परिणामी खरोखरच या संपर्क रस्त्यामुळे पै पाहुण्यांच्या भेटीगाठीत वाढ झाली आहे. शिवाय हे सर्वच संपर्क रस्ते शेतशिवारातून गेल्याने शेती व्यवसायाशी संबंधित शेतीमालाच्या वाहतुकीसाठी सुद्धा सोयीचे ठरले आहे. कडोली परिसराशी कडोली, अलतगा, जाफरवाडी, आंबेवाडी, अगसगा, हंदिगनूर, बेकिनकेरे, चलवेनट्टी, मण्णीकेरी, केदनूर, गुंजेनहट्टी, देवगिरी, बंबरगा, बेन्नाळी, काकती, होनगा सर्व या संपर्क रस्त्यांचा विकास झाल्यामुळे गावे एकमेकांशी जोडली गेली आहेत व जवळ आली आहेत.

Advertisement

कडोली गावाशी काकती, होनगा असे दोन स्वतंत्र संपर्क रस्ते जोडले गेले आहेत. कडोलीहून अगसगामार्गे बेकिनकेरे गावाहून बेळगाव-कोवाड मार्गाशी जाता येते. तसेच कडोली गावाहून अलतगा, आंबेवाडी असे स्वतंत्र संपर्क रस्ते निर्माण करण्यात आले आहेत. यामार्गे उचगाव, शिनोळी आणि महाराष्ट्राशी कमी अंतरात प्रवास करता येतो. अलतगा-आंबेवाडी रस्त्याचा विकास झालेला आहे. तर बेळगाव जाफरवाडी-कडोली-देवगिरी-बेन्नाळी असा प्रमुख मार्ग आहे. तसेच गुंजेनहट्टी-केदनूर-मण्णीकेरी-हंदिगनूरमार्गे कुदनूर, कालकुंद्री, कोवाड या महाराष्ट्राकडे जाणाऱ्या गावांना जाता येते. शिवाय कडोली आणि मण्णीकेरी संपर्क रस्त्याचेही विकासकाम जोमाने सुरू आहे. अगसगा, केदनूर या संपर्क रस्त्यासाठी आता निधी मंजूर झाला असून याही रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. जाफरवाडी ते गौंडवाड या शिवारातून जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. तर कडोली आणि गौंडवाड गाव जोडणारा एकमेव रस्ता दृष्टीक्षेपात असून मंत्री सतीश जारकीहोळी यांचे स्वीय सचिव मलगौडा पाटील यांनी या रस्त्याची पाहणी केली असून पुढील काळात याही रस्त्याचा विकास केला जाणार असल्याचे सांगितले. एकंदरीत कडोली परिसरातील एकमेकांशी जोडणाऱ्या संपर्क रस्त्यांचे जाळे निर्माण झाल्याने येथील ग्रामीण भागातील जनतेचे त्रास कमी होण्यास मदत झाली आहे. या रस्त्यांमुळे धगधगीचा प्रवास कमी झाला आहे. शहराकडे वाहनांची संख्या जास्ते असते. आता या ग्रामीण भागातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी असते. नेमका याचाच फायदा येथील जनतेला मिळणार आहे. ग्रामीण भागातील उद्योगधंदे वाढीसही मदत होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी

येथील संपर्क रस्त्याव्यतीरिक्त शेतशिवारात फार पूर्वीकाळापासून चालत आलेले (बैलगाडी मार्ग) रस्ते पाणंद आहेत. त्या रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात यावी. रोहयो योजनेंतर्गत या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी जेणेकरून शेती व्यवसायासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहेत. शेतीमालाची वाहतूक आणि बैलगाडी जाण्यासाठी पावसाळ्यादरम्यानही उपयुक्त होऊ शकतो. यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून पाणंद रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

यात्रा काळात सोयीचे

एखाद्या गावात महालक्ष्मी देवीची किंवा देवतांची यात्रा मोठ्या प्रमाणात होत असते. भाविकांची अशावेळी यात्रेला मोठी उपस्थिती असते. परंतु सदर गावाला संपर्क रस्त्यांची उणीव असेल तर मात्र भाविकांचे अतोनात हाल होत असतात. एकमेव रस्त्यावरून वाहतुकीची कोंडी होते. याचा विचार केल्यास संपर्क रस्त्यांची गरज निर्माण होते आणि हाच फायदा कडोली परिसरातील सर्व खेड्यांना या संपर्क रस्त्यांचा फायदा होणार आहे. संपर्क रस्त्यामुळे यात्रा काळात वाहतुकीची केंडी तर होणार नाहीच, शिवाय भाविकांचे त्रासही कमी होण्यास मदत होणार आहेत.

कडोली-होनगा संपर्क रस्त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ

कडोली ते होनगा या शिवारातून गेलेल्या संपर्क रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्यामुळे आम्हा शेतकऱ्यांसाठी सोयीचे झाले आहे. पावसाळ्यात यापूर्वी या नादुरुस्त रस्त्यावरून जाणे म्हणजे जोखमीचं होत चिखलाच्या साम्राज्यामुळे पायी चालणेदेखील अवघड जात होते. अशा अवस्थेत शेतीकडे जाऊन शेती करणे आणि शेतीमाल आणणे अवघड जात होते.

-निंगाप्पा रामू मायाण्णा (शेतकरी)

शेतीमालाची ने-आण करण्यास सोयीचे

कडोली परिसरात सर्वच गावांना जे कच्चे रस्ते होते. त्या सर्व रस्त्यांचा विकास झाल्यामुळे सर्वांना फार मोठ सोईचे झाले आहे. आता शेतापर्यंत आमच्या बैलगाड्या, वाहने कोणत्याही अडचणीविना जाऊ शकतात. शेतीमालाची ने-आण करण्यास आम्हाला सोईचे झाले आहे. शिवाय पै-पाहुण्यांना भेटण्यासाठी जायचे असेल तर या संपर्क रस्त्यांचा आधार मिळतो.

-रामाप्पा बसाप्पा देसाई (शेतकरी)

Advertisement
Tags :

.