विकसित भारत म्हणजे देशातील प्रत्येक सामान्य नागरिकांचा विकास- ज्योतिरादित्य सिंधिया
पुलाची शिरोली / वार्ताहर
भारताला गरीबीमुक्त, गौरवशाली आणि संपूर्ण जगाचा मार्गदर्शक देश बनवणे हा संकल्प घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अविरतपणे कार्यरत आहेत. विकसित भारत म्हणजे एका राज्याचा, एका जिल्ह्याचा किंवा एका गावाचा विकास नसून देशातील प्रत्येक सामान्य नागरिकांचा विकास आहे. असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. विकसित भारत संकल्प यात्रेच्या मौजे वडगाव ( ता. हातकणंगले ) येथील कार्यक्रमात ते बोलत होते. सरपंच कस्तुरी पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. खासदार धैर्यशील माने, माजी आमदार अमल महाडिक, भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, समरजीतसिंह घाटगे प्रमुख उपस्थित होते.
मंत्री सिंधिया म्हणाले, विकसित भारत संकल्प रथयात्रा ही एका पक्षाची किंवा एका सरकारची नसून ही सामान्य जनतेच्या विकासाची आणि विश्वासाची रथयात्रा आहे. भारताला शक्तिशाली देश म्हणून पुढे न्यायचे असेल तर देशातील १४० कोटी जनतेला शक्तिशाली बनवले पाहिजे. भारताच्या संसाधनावरती प्रथम अधिकार हा देशातील गरिब व सर्व सामान्य जनतेचा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून दहा वर्षात चार कोटी जनतेला घर मिळाले. पन्नास दिवसांमध्ये दहा कोटी जनतेला आयुष्यमान योजनेचे गोल्डन कार्ड मिळाले. तर उज्वला गॅस योजनेचा दहा कोटी जनतेला लाभ मिळाला आहे. प्रधानमंत्री जनधन योजना, किसान सन्मान योजना, आदी माध्यमातून देशाला आत्मनिर्भर बनविण्याचा हा संकल्प आहे असे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांची भेट घेऊन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्याशी संवाद साधला. प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी सौ दिपाली विजय तेली यांच्या घरी भेट देऊन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ड्रोनव्दारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
जिल्हाधिकारी राहूल रेखावार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला एका धाग्यात पकडले आहे. आपला देश जगात एक नंबरला आणण्यासाठी मोदी नवनवीन संकल्पना राबवत आहेत. याचाच माग म्हणून गावोगावी लाभार्थींची निवड करुन त्यांना लाभ पोहचवण्यासाठी सर्व केंद्रीय मंत्री कार्यरत केले आहेत. आयुष्यमान भारत यामध्ये कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर असेल.असे सांगितले तसेच पंतप्रधान मोदींचे स्वप्न साकार करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना सशक्त करुन देश महाशक्ती बनवूया असे आवाहन रेखावार यांनी केले.
यावेळी भाजपच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा सौ. शौमिका महाडिक, जिल्हा अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर यांनी मनोगतव्यक्त केले.
ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल चौगुले यांनी स्वागत केले.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रकल्प संचालक सुषमा देसाई, अशोकराव माने, अरुणराव इंगवले, हिंदुराव शेळके, शिरोली सरपंच सौ. पद्मजा करपे, सौ. कमल कौंदाडे, विजय पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील, सौ.अश्विनी पाटील, पिंटू करपे, अरुण माळी, प्रकाश पोवार, किरण मिठारी, सुनिल खारेपाटणे, अविनाश पाटील, सुरेश कांबरे, अॅड. विजय चौगुले, उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, तहसिलदार कल्पना ढवळे, गट विकास अधिकारी शबाना मोकाशी, ग्रामविकास अधिकारी ए.एस.कठारे, ए.वाय.कदम,भारती पाटील, अनुपमा सिदनाळे,श्रीकांत सावंत आदी उपस्थिती होते.