गोवावेस येथील बसवेश्वर सर्कलचा विकास करा
विनायक गुंजटकर यांची महापौरांकडे मागणी
बेळगाव : गोवावेस येथील श्री बसवेश्वर सर्कल येथे सिग्नलचे नियोजन नसल्यामुळे अनेक अपघात होत आहेत. चार रस्ते एकत्र आले असले तरी याचा मध्यावधी भाग एका बाजूला असल्यामुळे वाहने हाकताना अडथळे येत आहेत. त्यामुळे बसवेश्वर सर्कलचा राणी चन्नम्मा सर्कलप्रमाणे विकास करावा अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी बुधवारी महापौर मंगेश पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. बसवेश्वर सर्कल हा खानापूर रोडशी (आरपीडी) जोडण्यात आला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले रोड, शहापूर रोड व दुसऱ्या बाजूला रेल्वे ओव्हर ब्रिजकडून येणारे रस्ते एकाच ठिकाणी येतात. परंतु वाहनचालकांना सिग्नल पाहणे अवघड होत आहे. नियोजनबद्ध पद्धतीने सिग्नल बसविण्यात आलेले दिसत नाहीत. रेल्वे ओव्हर ब्रिजकडून आलेली वाहने शहापूरला जाताना महात्मा फुले मार्गे येणाऱ्या वाहनांचा विचार न करताच पुढे सरकत आहेत. यामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. सर्कलच्या मध्यावधी भागात बसविण्यात आलेले कारंजे सध्या बंद आहेत. तर महात्मा फुले रोडवरील शेतकरी व म्हशीचा पुतळा वाईट अवस्थेत आहे. त्यामुळे या गोवावेस सर्कलचा विकास करावा, अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली.