पाटणा पायरेट्सच्या विजयात देवांक दलालची चमक
पाटणा पायरेट्सने वंगाल वॉरियर्सचा तीन गुणांनी पराभव केला.
► वृत्तसंस्था / नोएडा
2024 च्या कबड्डी हंगामातील येथे सुरू असलेल्या 11 व्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील अटीतटीच्या सामन्यात देवांक दलालच्या शानदार कामगिरीच्या जोरावर पाटणा पायरेट्सने बंगाल वॉरियर्सचा 38-35 अशा तीन गुणांच्या फरकाने पराभव केला.
या सामन्यात पाटणा पायरेट्स संघातील प्रमुख रायडर देवांक दलालने सुपर-10 सह एकूण 13 गुण मिळविले. दलालने या सामन्यात आपल्या चढाईवरील 194 गुणांची नोंद केली. पाटणा पायरेट्स संघातील दीपकने 5 गुण मिळविले. बंगाल वॉरियर्स संघातील प्रमुख रायडर मनिंदर सिंगने प्रो कबड्डी लीग स्पर्धेत 1500 गुणांची नोंद केली आहे. यापूर्वी प्रदीप नरवालने असा विक्रम नोंदविला असून मनिंदरसिंग हा दुसरा कब•ाrपटू आहे.
या सामन्यात पहिल्या सत्रात बंगाल वॉरियर्सने आपल्या भक्कम बचाव तंत्राच्या जोरावर पाटणा पायरेट्सच्या देवांक दलाल आणि लोचाब यांना चांगलेच रोखले होते. बंगाल वॉरियर्सच्या चढाईचे नेतृत्व मनिंदरसिंगकडे सोपविण्यात आले होते. सामन्यातील 20 व्या मिनिटाला देवांकच्या चढाईवर मिळालेल्या गुणांमुळे पाटणा पायरेट्सने बंगाल वॉरियर्सवर आघाडी मिळविली. मध्यंतरावेळी पाटणा पायरेट्सचा संघ बंगाल वॉरियर्सवर 19-15 अशा गुणांनी वरचढ होता.
सामन्याच्या उत्तरार्धात बंगाल संघाचा खेळ अधिक आक्रमक आणि भेदक झाला. मनिंदरसिंग आणि नितीनकुमार धनकर यांनी पाटणा पायरेट्सवर चांगलेच दडपण आणले. दरम्यान लोचाबने आपल्या सुपर चढाईवर नितेशकुमार, मनिंदरसिंग आणि सिद्धेश यांना बाद केले. पण त्यानंतर देवांकच्या चढाईमुळे बंगाल वॉरियर्सचे पहिल्यांदा सर्वगडी बाद झाले. शेवटच्या पाच मिनिटांच्या कालावधीत पाटणा पायरेट्सने बंगालवर 3 गुणांची आघाडी घेत अखेर हा सामना 38-35 असा जिंकला.