देवाचीहट्टी पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली
हब्बनहट्टी मारुती मंदिर देखील बुडाले : दुपारपर्यंत वाहतूक बंद : पाणी कमी झाल्यानंतर पूर्ववत
वार्ताहर/कणकुंबी
कणकुंबी भागात बुधवारी रात्रभर मुसळधार पाऊस झाल्याने गुरूवारी सकाळी हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले. तर देवाचीहट्टी येथील मलप्रभा नदीवरील पुलावर दोन फूट पाणी आल्याने बराच काळ वाहतूक रोखली होती. जून, जुलै महिन्यात कणकुंबी येथील पर्जन्यमापक केंद्रात 4052 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात केवळ 814.2 मि. मी. तर जुलै महिन्यात 3238.2 मि. मी.पाऊस झाला आहे. गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदीवरील तोराळी, देवाचीहट्टी हे दोन्ही ब्रिजकम बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यावर्षी दुसऱ्यांदा हे दोन्ही ब्रिज पाण्याखाली गेल्याने गुरुवारी सकाळी तळावडे गोव्याची गावाला जाणारी खानापूर आगाराची बस हब्बनहट्टी देवस्थानहून माघारी फिरली. पावसाचा जोर वाढल्याने मलप्रभा नदीला पूर आला आहे. देवाचीहट्टी पुलावर पाणी आल्याने बैलूर, मोरब, बाकमूर, बेटगिरी, गोल्याळी, तळावडे, तोराळी, देवाचीहट्टी आदी गावांची वाहतूक दुपारपर्यंत बंद झाली होती. पावसाचा जोर ओसरल्यावर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
हब्बनहट्टी मारुती मंदिराच्या कळसापर्यंत दुसऱ्यांदा पाणी
दोन दिवसांपूर्वी पावसाचा जोर ओसरला होता. परंतु बुधवारी दुपारनंतर गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरूवारी सकाळी मलप्रभा नदीला पूर आला. मागील आठवड्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हाहाकार माजविला होता. परंतु गेले दोन दिवस वारा नसताना मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषत: रात्रभर मुसळधार पाऊस होत असल्याने तोराळी आणि देवाचीहट्टी येथील मलप्रभा नदीवरील पुलावरून पाणी गेले. त्यामुळे काही काळ वाहतूक रोखण्यात आली होती. हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती मंदिर पाण्याखाली गेले होते. यावर्षी मंदिराच्या कळसापर्यंत दुसऱ्यांदा पाणी आले होते.