द जर्नीमॅनमध्ये देव पटेल
टेनिस थ्रिलर चित्रपट
भारतीय वंशाचा हॉलिवूडमधील अभिनेता देव पटेलने अलिकडेच मंकी मॅन या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले होते. देव पटेल आता ब्रायन अणि एलेक्सिस रॉबर्ट्स यांच्या पटकथेवर आधारित क्राइम थ्रिलर ‘द जर्नीमॅन’ चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरसेम सिंह करणार आहेत.
द जर्नीमॅन चित्रपटात देव पटेल एक खराब नशीब असलेल्या टेनिसपटूच्या भूमिकेत आहे. हा टेनिसपटू स्वत:च्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मॅच फिक्सिंगच्या प्रकारात अडकत असल्याचे चित्रपटात दाखविले जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती पुढील वर्षी सुरू होणार आहे.
द सेल आणि द फॉल या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाऱ्या तरसेम यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी देव पटेलला मिळाली आहे. देव पटेलने ‘स्लमडॉग मिलिनेयर’ या चित्रपटापूर्वी ‘स्किन्स’द्वारे स्वत:ची कारकीर्द सुरू केली होती. लायन या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते. हॉटेल मुंबइं, द पर्सनल हिस्ट्री ऑफ डेव्हिड कॉपरफील्ड आणि द ग्रीन नाइट या चित्रपटांमध्येही त्याने अभिनय केला आहे.