दशकभराची प्रतीक्षा संपवण्याचा निर्धार
स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्कनेही टीम इंडियाला डिवचले: बॉर्डर-गावसकर ट्रॉफी अॅशेसइतकीच महत्वाची,स्पर्धेआधीच कांगांरुचे स्लेजिंग
वृत्तसंस्था/सिडनी, मुंबई
बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सुरु होण्यास तीन महिन्याचा कालावधी असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शाब्दिक जंग सुरू केली आहे. दोन दिवसापूर्वी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स व फिरकीपटू नॅथन लियॉननंतर आता अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथनेही टीम इंडियाला डिवचले आहे. ऑस्ट्रेलियाला 2014-15 नंतर भारताविरुद्ध कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. आगामी मालिकेत ही प्रतीक्षा संपवण्याचा आमचा निर्धार असल्याचे अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ म्हणाला.
सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन सर्वोत्तम कसोटी संघ आहेत. गेल्या वर्षी आमच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामनाही झाला होता. आम्ही त्यात विजयी झालो. त्याआधी भारताने दोन वेळा आम्हाला मायदेशात हरवण्याची कामगिरी केली. त्यांनी खूप चांगला खेळ केला आणि त्याचे श्रेय त्यांना मिळाले पाहिजे. आम्ही दहा वर्षांपासून बॉर्डर-गावसकर करंडक उंचावलेला नाही. ऑस्ट्रेलियन संघासाठी हे मोठे अपयश आहे. मात्र, आता हे अपयश पुसून टाकून भारताला नमवण्याचा आमचा मानस आहे, असे स्मिथने सांगितले. सध्याचा भारतीय संघ सर्वोत्तम आहे. रोहित, विराट, बुमराहृ मोहम्मद शमीसह अनेक खेळाडू भारतीय संघात आहेत. यामुळे मायदेशात त्यांना पराभूत करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम योगदान द्यावे लागेल, असेही स्मिथने यावेळी नमूद केले.
टीम इंडियाचा दबदबा संपवणार
स्टीव्ह स्मिथसाठी ही मालिका विशेष महत्त्वाची आहे, कारण गेल्या दशकभरापासून ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्ध ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. स्मिथ पुढे म्हणाला, आम्हाला घरच्या मैदानावर फासे फिरवायचे आहेत. दशकभरापासून टीम इंडियाने ही ट्रॉफी जिंकली आहे, हे खरे आहे. पण, मला आशा आहे की ऑस्ट्रेलियन संघ यंदा पलटवार करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
अॅशेसइतकीच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी महत्वाची : मिचेल स्टार्क
बॉर्डर-गावसकर करंडक क्रिकेट मालिकेला आता प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेइतकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. आम्ही भारताविरुद्ध आगामी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत असल्याचे विधान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने केले आहे. तीन दशकांत प्रथमच बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत पाच सामने खेळवले जाणार आहेत. याबाबत बोलताना स्टार्क म्हणाला, या मालिकेत आता पाच सामने झाले आहेत, जे अॅशेस मालिकेइतकेच महत्वाचे असतील. घरच्या मैदानावर आम्हाला नेहमीच प्रत्येक सामना जिंकायचा असतो. भारत हा खूप मजबूत संघ आहे हे आम्हाला माहीत आहे. ही मालिका चाहत्यांसाठी आणि अर्थातच खेळाडूंसाठी खूप रोमांचक आहे. आशा आहे की 8 जानेवारीला आम्ही तिथे बसू तेव्हा आमच्याकडे ती ट्रॉफी असेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणे हेच आमचे लक्ष्य : रोहितही गरजला
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बुधवारी वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरस्काराने गौरवण्यात आले. रोहितच्या नेतृत्वाखाली अलीकडे टीम इंडियाने टी 20 वर्ल्डकप उंचावला आणि आता रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी व वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकण्याच्या तयारीत आहे. यावेळी रोहित म्हणाला, मी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्यामागे एक कारण आहे. मी थांबणारा नाही, कारण एकदा का तुम्हाला सामने जिंकण्याची, कप जिंकण्याची चव चाखायला मिळाली की, तुम्ही थांबायला नको. आम्ही एक संघ म्हणून पुढे जात राहू. आगामी काळात टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मासह विराट कोहली बुमराह असे अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपआधी ही मालिका भारतासाठी महत्वाची असणार आहे. मागील दोन स्पर्धेत भारताने जेतेपद मिळवले आहे. आता, ऑस्ट्रेलियात ही मालिका होणार असल्याने ही मालिका आमच्यासाठी आव्हानात्मक असेल, असे रोहित यावेळी म्हणाला.