कंग्राळी बुद्रुक गावात कुस्ती परंपरेला चालना देण्याचा निर्धार
बंद पडलेल्या तालमी पुन्हा सुरू करून कुस्ती परंपरेला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न : कुस्तीप्रेमींचे प्रयत्न : नवीन होतकरू पैलवानांना सुवर्णसंधी
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
पैलवानांचं गाव म्हणून ओळख असलेल्या कंग्राळी बुद्रुक गावातील कुस्ती परंपरा गेली 35 वर्षे लोप पावली होती. यामुळे गावातील सर्व तालमी आखाडे बंद होते. तालमीमध्ये दंड बैठका मारणे व आखाड्यातील लाल मातीमध्ये कुस्ती खेळणे हे सारेसुद्धा बंद झाले होते. परंतु बाहेर गल्ली येथील कुस्तीप्रेमी ग्रा. पं. सदस्य यल्लोजी पाटील, दत्ता पाटील, वॉर्ड कमिटी सदस्य सुभाष पाटीलसह वॉर्ड कमिटी इतर सदस्य तरुण युवक व इतर कुस्तीप्रेमी नागरिकांनी खंडित कुस्ती परंपरेला उर्जितावस्था आणण्यासाठी गुरुवारी घटस्थापनेच्या शुभमुहुर्तावर गल्लीतील लाल मातीची तालीम सुरू करण्याचा संकल्प केल्यामुळे कुस्तीप्रेमी नागरिकांतून व तरुण वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.
कंग्राळी बुद्रुक गावामध्ये बाहेर गल्ली, लक्ष्मी गल्ली, श्री कलमेश्वर गल्ली अशा तीन तालमी होत्या. या तालमीतून त्याकाळी अनेक नामांकित पैलवान होऊन गावचे नाव उज्ज्वल केले आहे. परंतु गेली 35 वर्षे गावातील ही लाल मातीतील कुस्ती परंपरा लोप पावली होती. यामुळे गावामध्ये एकाही पैलवानचे नाव ऐकावयास मिळत नव्हते. एखाद्या गावामधील कुस्तीफडामध्ये सुद्धा कधीच कंग्राळी बुद्रुक गावचे कुस्ती पैलवानाचे नाव ऐकावयास मिळत नव्हते. यामुळे गावातील कुस्तीप्रेमींना आपल्या गावामध्ये एखाद्या पैलवान कधी तयार होणार, अशी आशा लागून राहिली होती. परंतु घटनेस्थापने दिवशी बाहेर गल्लीतील नागरिकांनी बंद पडलेली कुस्ती परंपरा बंद तालीम परत सुरू करून पैलवानांचे कंग्राळी बुद्रुक हे गाव हे नाव परत तालुक्यामधील कुस्तीप्रेमींमध्ये रूजवायचे काम सुरू असल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
होतकरु पैलवानांना मदतीचे आश्वासन
यावेळी ग्रा.पं. सदस्य यल्लो पाटील, दत्ता पाटील यांनी नवीन होतकरु पैलवानांना खुराकासाठी आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले. यावेळी वॉर्ड कमिटी सदस्य धाकलु भागणकर यांच्या हस्ते नवीन तालीम आखाड्याचे पूजन करण्यात आले. तर यल्लोजी पाटील, दत्ता पाटील व सुभाष पाटील यांच्याहस्ते आखाड्याचे उद्घाटन झाले. यावेळी देवाप्पा निलजकर, गणपत पाटील, भाऊराव पाटील, शंकर पाटील, रामा निलजकर, लक्ष्मण नाईक, बळवंत निलजकर, नारायण कागणकर, राहुल पाटीलसह बाल तरुण युवक मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
बेळगावचे पहिले महापौर केसरी कै. पै. गुंडू पाटील
पैलवानाचे गाव म्हणून ओळख असलेल्या गावांमध्ये कै. पै. गुंडू पाटील हे एक महान पैलवान होऊन गेले. त्यानी कर्नाटक, महाराष्ट्र राज्याबरोबर इतर राज्यातील कुस्ती आखाड्यामध्ये विजय संपादन करून कंग्राळी बुद्रुक गावच्या नावामध्ये मानाचा तुरा रोवण्याचे काम केले होते. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये देशसेवा बजावत त्यांनी बेळगाव महानगरपालिकेतर्फे ठेवण्यात आलेल्या महापौर केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत विजय मिळवून महापौरपद मिळवून बेळगाव महानगरपालिकेचे पहिले महापौर केसरीपद मिळवून कंग्राळी बुद्रुक गावचे नाव उंचावले होते. दुसरे पै. गोपाल पाटील, पै. गणपत पाटील यांनीही पोलीस खात्यामध्ये सेवा बजावत अनेक कुस्ती आखाडे जिंकत गावचे नाव अजरामर केले होते. या तिन्ही पैलवानांनी कंग्राळी बुद्रुक गावच्या नावामध्ये मानाचा तुरा रोवण्याचे काम केले आहे. त्यांनाच गुरु मानून बाहेर गल्लीतील कुस्तीप्रेमी तरुण व नागरिकांनी तालीम सुरू करण्याचा मानस केल्यामुळे कुस्तीला परत उर्जितावस्था प्राप्त झाली आहे.