नियतीलाच हवे आहे अयोध्येतील राममंदीर !
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रामजन्मभूमी आंदोलनाचे एकेकाळचे आधारस्तंभ आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्येतील राममंदिरासंबंधात एक महत्वपूर्ण विधान करुन त्यांच्या संदर्भात उपस्थित करण्यात आलेल्या सर्व वादांवर पडदा टाकला आहे. हे मंदीर होणे हे विधीलिखित आहे. नियतीलाच ते हवे आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदिरात भगवान रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करतील, तेव्हा ते भारताच्या प्रत्येक नागरीकाचे प्रतिनिधित्व करीत असतील, असे प्रशंसोद्गार काढताना आपण या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहोत, हे त्यांनी घोषित केले.
हे राममंदीर सर्व भारतीयांना प्रभू श्रीरामांचे गुण अंगिकारण्याची प्रेरणा देईल, अशी माझी प्रार्थना आहे. जेव्हा मी राममंदिरासाठी रथयात्रा काढली, तेव्हाच मला हा अनुभव आला होता मी या आंदोलनाचा केवळ एक सारथी आहे. या रथयात्रेचा प्रमुख संदेशवाहक तो रथच होता. तो रथ पूजनीय होता, कारण तो रामजन्मभूमीच्या स्थानी भव्य राममंदीर निर्माण करण्याचा संदेश घेऊन अयोध्येला निघाला होता. तो रथच या आंदोलनाचे नेतृत्व करीत होता, असे भावपूर्ण उद्गार त्यांनी राष्ट्रधर्म या मासिकाला एक प्रदीर्घ मुलाखत देताना काढले.
विश्व हिंदू परिषदेची घोषणा
राम मंदीर आंदोलनात प्रमुख भूमिका साकारणारे लालकृष्ण अडवाणी 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, अशी घोषणा विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अलोक कुमार यांनी गेल्या गुरुवारी केली होती. राष्ट्रधर्म या मासिकाला मुलाखत देताना अडवाणी यांनी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने या संबंधीचा वाद मिटण्याची शक्यता आहे. अडवाणी 21 जानेवारीलाच अयोध्येला जाण्याची शक्यता आहे.
अडवाणींची भूमिका का महत्वाची ?
1990 मध्ये अडवाणी यांनी देशव्यापी रामरथयात्रा काढली होती. या यात्रेमुळे देशात राममंदिराचा विषय घरोघरी पोहचला होता. या विषयाला हिंदू समाजाच्या सर्व घटकांमधून व्यापक समर्थन मिळविण्याचे महत्वाचे कार्य अडवाणी यांच्या त्या रथयात्रेने केले होते. या रथयात्रेमुळे भारतीय जनता पक्ष रामजन्मभूमी आंदोलनाशी उघडपणे जोडला गेला. तसेच आंदोलनात जनसमर्थनाची धार प्राप्त झाली. भारतीय जनता पक्षालाही व्यापक राजकीय जनाधार मिळत गेला. या रथयात्रेमुळे भारताच्या राजकारणाची दिशा पालटली, असे अनेक जाणकारांचे मत आहे.