आमचा मंत्री ‘नाटककार’ तरीही कला अकादमीची दुर्दशा
आमदार मायकल लोबो यांची सरकारवर बोचरी टीका
पणजी / प्रतिनिधी
राज्याची अस्मिता असलेली आणि गेले अनेक दशके गोव्याचे नाव सातासमुद्रापार नेलेली कला अकादमी आज मरगळलेल्या अवस्थेत आहे. कला व संस्कृती खात्याचा आमचा मंत्री चांगला नाटककार आहे, तरीही कला अकादमीची दुर्दशा झालेली पाहवत नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वचक राहिला नसल्यानेच असे प्रकार घडत आहेत, अशी बोचरी टीका सत्ताधारी भाजप पक्षाचेच आमदार मायकल लोबो यांनी काल विधानसभेत केली.
कला अकादमीतील ध्वनी यंत्रणेत सुधारणा व्हावी, म्हणून आपण स्वत: 80 हजार रुपये दिले होते, तरीही यंत्रणेत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे सरकारने आपले पैसे परत करावेत, असेही लोबो म्हणाले.
लोबो पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले व्हिजन धुळीस मिळवण्यास नोकरशाही पेटून उठली आहे. सरकारी नोकर भ्रष्टाचाराची परमसीमा गाठून सरकारला बदनाम करीत आहेत. त्यांच्यावर वचक मात्र कोणाचा राहिलेला नाही. मुख्यमंत्री स्वत: अभ्यासू व चांगली व्यक्ती आहे. परंतु सरकारच्या या गलथान कारभारावर डोळेझाक न करता मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलेच पाहिजे, असा हट्ट त्यांनी धरला अर्थसंकल्पावर चर्चा करण्याच्या निमित्ताने लोबो यांनी सरकारला हा घरचा अहेर दिला.
डीजीपींच्या हकालपट्टीची आली वेळ
आसगाव प्रकरणी काय गोंधळ झाला तो आपल्याला अजिबात आवडलेला नाही. या प्रकरणामुळे पोलीस महासंचालकाची (डीजीपी) हकालपट्टी करण्याची वेळ राज्यावर आली, याबाबतचे स्पष्टीकरणही गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री सावंत यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
पोलीस कर्तव्याला चुकतात
सरकार पोलिसांना वेळेवर वेतन देते, पण पोलीस मात्र कर्तव्याला चुकतात. चोरी प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. खून वाढले आहेत, असे सांगून पोलीस निक्रिय झाले आहेत की काय असा प्रश्न त्यांनी केला. खाण व्यवसाय सुरू करण्यात आलेले अपयश, पर्यटन व्यवसायाकडे झालेले दुल, वाढते अपघात तसेच रस्त्यांची दुर्दशा असे विषय त्यांनी मांडले.
उत्तम स्वच्छतागृहांची सोय व्हावी
शिक्षणासाठी चांगली आर्थिक तरतूद केली आहे. त्याद्वारे कायमस्वऊपी शिक्षक नेमण्याचा सरकारने विचार करावा. राज्यातील अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहांची सोय नाही. जी आहेत, ती अत्यंत हलाखीच्या स्थितीत आहेत. त्यामुळे शाळांमध्ये स्वच्छतागृहांची उत्तम सोय करावी, अशी मागणी लोबो यांनी केली.
स्टार्टअपची प्रक्रिया सुटसुटीत करावी
स्वयंपूर्ण गोवा ही मुख्यमंत्र्यांची संकल्पना चांगली आहे. पण, यासाठी युवकांनी स्टार्टअपसाठी प्रयत्न केल्यास त्यांना कागदपत्रे मिळविण्यासाठी तसेच ना हरकत दाखले मिळविण्यासाठी सहा सहा महिने धावपळ करावी लागते. त्यामुळे राज्यातील युवक स्वयंपूर्ण खरेच होताहेत का याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा. प्रक्रिया सुटसुटीत झाली तरच युवक स्टार्टअपमध्ये नेटाने उतरतील, असेही ते म्हणाले.
राज्यातील रस्ते उत्तम दर्जाचे असावेत यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी रस्ते सुधारणांसाठी आर्थिक तरतूद केली ती कौतुकास्पद आहे. रस्त्यांवर होणारे अपघात हे इतर राज्याच्या तुलनेत अधिक आहेत. त्यामुळे खास समिती नेमून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायला हवा.
गोमंतकीय टॅक्सी व्यवसायिक त्रासात राज्यातील टॅक्सी व्यावसायिक हे गोमंतकीय असून, त्यांनी दागदागिने गहाण ठेवून वाहने खरेदी केलेली आहेत. या व्यवसायात उतरलेले गोमंतकीय युवक त्रासात सापडले आहेत. याचे कारण म्हणजे हॉटेलमधील पर्यटकांचे भाडे भलताच कुणीतरी घेऊन जातो, असे प्रकार घडत आहेत. किनारी भागातील युवक यामध्ये अधिक पिचले जात आहेत. त्यामुळे सरकारने स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना अभय देण्याची गरज आहे, असेही मायकल लोबो म्हणाले. |
ही भविष्याची नांदी... मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पात शेतीच्या उद्धारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद केलेली आहे. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितच राज्यातील शेतक्रयांना होत आहे. अनेक ठिकाणी पडीक असलेली जमीन आता लागवडीखाली आलेली आहे. ही भविष्याची नांदी आहे. तरीही सरकारने पारंपरिक शेती म्हणून भाजीपाला शेतीसाठी विशेष अनुदान देण्याची तरतूद करावी, अशी मागणी मायकल लोबो यांनी केली. |