निवडणुकीत पराभव, तरीही इशिबाच पंतप्रधान
अमेरिकेच्या शुल्कासारख्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर निर्णय : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नाही बहुमत
वृत्तसंस्था/ टोकियो
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा हे निवडणुकीत पराभव झाल्यावरही अमेरिकेच्या शुल्कासारख्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पदावर कायम राहणार आहेत. वाढती महागाई आणि अमेरिकेच्या वाढीव आयातशुल्कासारख्या आव्हानांना सामोरे जाण्याकरता मी पंतप्रधान पदावर कायम राहणार असल्याचे शिगेरू इशिबा यांनी सोमवारी सांगितले आहे.
इशिबा यांना जपानच्या एका महत्त्वपूर्ण निवडणुकीत मोठ्या पराभवाला तोंड द्यावे लागले आहे. रविवारी झालेल्या मतदानात इशिबा यांच्या सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पार्टी आणि आघाडीतील सहकारी पक्ष कोमइतोला 248 सदस्यीय वरिष्ठ सभागृहात बहुमत मिळु शकले नाही. बहुमतापेक्षा तीनने संख्याबळ कमी राहिले आहे. आघाडी आता संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये अल्पमतात आहे, परंतु एलडीपी अद्याप संसदेतील सर्वात मोठा पक्ष आहे.
निवडणुकीचा निकाल मी गांभीर्याने घेतो, परंतु माझी प्राथमिकता राजकीय समस्या निर्माण होण्यापासून वाचणे आणि अमेरिकेसोबत शुल्क कराराच्या 1 ऑगस्टच्या कालमर्यादेसह अनेक आव्हानांना सामोरे जाणे आहे. एका पस्परर स्वरुपात आवश्यक करारावर आम्ही पोहोचू अशी अपेक्षा आहे, तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार असल्याचे पंतप्रधना इशिबा यांनी म्हटले आहे.
निवडणूक निकालांवरून स्वत:च्या गंभीर जबाबदारीची मला जाणीव आहे, परंतु देश आणि लोकांबद्दल जबाबदारी पार पाडावी, जेणेकरून राजकारण ठप्प किंवा दिशाहीन होऊ नये असे माझे मानणे आहे. जागतिक स्थिती आणि नैसर्गिक आपत्तीसारखी आव्हाने अनुकूल राजकीय स्थितीची प्रतीक्षा करू शकत नसल्याचे उद्गार इशिबा यांनी काढले आहेत.
कनिष्ठ सभागृहातही नाही बहुमत
इशिबा यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुकीत बहुमत गमाविले होते. तेव्हापासून इशिबा यांच्या अलोकप्रिय सरकारला संसदेत विधेयके संमत करविण्यासाठी विरोधी पक्षांसमोर झुकावे लागत आहे. इशिबा यांचे सरकार जपानचे मुख्य पारंपरिक खाद्यान्न तांदळाची टंचाई रोखणे, महागाईवर नियंत्रण आणि घटत्या मजुरीला रोखण्यासाठी त्वरित प्रभावी उपाययोजना करण्यास अपयशी ठरल्याचा मतप्रवाह जपानमध्ये आहे.
25 टक्के आयातशुल्काचा झटका
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार चर्चेत प्रगती होत नसल्याची तक्रार करत जपानवरील दबाव वाढविला आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांनी जपानला अमेरिकन ऑटो उत्पादने आणि तांदळाच्या विक्रीत घट होत असल्याची तक्रार करत दबाव वाढविला होता. ट्रम्प यांनी जपानवर 25 टक्के आयातशुल्क लादले जाणार असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेचे हे आयातशुलक जपानवर 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय जपानमधील इशिबा सरकारसाठी आणखी एक मोठा झटका ठरला आहे.