इच्छा आणि राग ह्यावर साधना करून ताबा मिळवावा
अध्याय दुसरा
मनुष्यस्वभाव हा सत्व, रज आणि तम या तीन गुणांपासून तयार होतो. त्यापैकी कोणत्यातरी एका गुणाचा त्याच्या स्वभावात जोर असतो आणि त्या गुणाला अनुरूप अशी वर्तणूक माणसाकडून होते. सत्वगुणी मनुष्य ईश्वराने दिलेलं काम चोख करून ते ईश्वराला अर्पण करून स्वस्थ राहतो. रजोगुणी मनुष्य अतोनात इच्छा मनात धरून त्यांच्या पूर्तीसाठी, तर तमोगुणी मनुष्य मी म्हणतोय, मी करतोय तेच बरोबर आहे असं सांगत असतो आणि त्याला जो आडवा येईल त्याच्यावर राग धरून, त्याला नष्ट करून पापाचरण करत असतो.
रजोगुणी माणसाला होणाऱ्या इच्छा किंवा तमोगुणी माणसाला येणारा अनावर क्रोध यावर अधिक भाष्य करणारा
आवृणोति यथा माया जगद्बाष्पो जलं यथा । वर्षामेघो यथा भानुं तद्वत्कामो खिलांश्च रुट् ।। 38।।
हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार काम व क्रोध ह्यांनी सर्व जगाला वेढून टाकले आहे. वेढून टाकणे म्हणजे कडेकोट बंदोबस्तात ठेवणे. निरनिराळ्या इच्छा आणि त्या पूर्ण होत नाहीत असं दिसलं की, होणाऱ्या चडफडाटातून होणारी चिडचिड रागातून व्यक्त होते. काही काळ गेला की, मनुष्य शांत होतो. म्हणजेच शांत, स्वस्थ असणे हे माणसाचे मूळ स्वरूप आहे. बाप्पांना सांगायचं आहे की, माणसाच्या शांत, स्वस्थ अशा मूळ स्वरूपावर इच्छा आणि राग यांचे वेष्टण मी कर्ता आहे ह्या भ्रमामुळे घातले गेले आहे. कित्येकवेळा आपण म्हणतोसुद्धा की, तो ना, जरा रागीट आहे पण मनाने चांगला आहे. लवकरच त्याचा राग शांत होईल आणि त्याच्या शांत प्रसन्न स्वभावाचा अनुभव येईल. म्हणून माणसाने निरिच्छ होण्याचा प्रयत्न करावा म्हणजे क्रोधापासून त्याची आपोआपच सुटका होईल.
माणसाच्या साध्या सरळ आयुष्यामध्ये निरनिराळ्या इच्छांचे तरंग उमटत असतात. इच्छा झाली की, ती पूर्ण व्हावी म्हणून त्याचे प्रयत्न सुरू होतात पण प्रत्येक इच्छा काही पूर्ण होतेच असं नाही. मग राग येतो आणि चिडचिड होते. हे सर्व मनुष्याच्या रजोगुणी व तमोगुणी स्वभावामुळे घडतं. रजोगुणी आणि तमोगुणी मनुष्याच्या मूळ स्वभावावर किंवा स्वरूपावर हे वेष्टण चढलेलं आहे हे लक्षात घेऊन माणसाने साधनेच्या माध्यमातून प्रयत्न करून हे वेष्टण काढून टाकायचा प्रयत्न करावा. यालाच अध्यात्मात स्वरूपाचा शोध घेणे असं म्हणतात. ह्या वेष्टणाने माणसाचे ज्ञान झाकून टाकले जाते असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
प्रतिपत्तिमतो ज्ञानं छादितं सततं द्विषा ।
इच्छात्मकेन तरसा दुष्पोष्येण च शुष्मिणा ।।39।।
अर्थ- इच्छारूपी, वेगवान, तृप्ति करण्यास अशक्य व अग्निरूपी अशा या शत्रूने ज्ञानी मनुष्याचे ज्ञान सतत आच्छादलेले आहे.
विवरण- परमार्थात ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. या आत्मज्ञानामुळे मनुष्याच्या हे लक्षात येते की, आपलं आयुष्य पूर्वनियोजित असून घडणाऱ्या घटना ईश्वरी इच्छेनुसार घडत आहेत आणि त्याच्या हिताच्या आहेत. आयुष्यात घडणाऱ्या घटना त्याच्या पूर्वकृत्याचे परिणाम आहेत. काहीही झालं तरी यात बदल होणं शक्य नाही पण माणसाला वेळोवेळी होणाऱ्या इच्छांनी हे ज्ञान झाकोळून जाते. तो स्वत:ला कर्ता समजतो आणि इच्छापूर्ती होण्यासाठी, आयुष्यात त्याच्या दृष्टीने, त्याला अनुकूल घटना घडवण्यासाठी धडपडू लागतो. बरं एखादी इच्छा झाल्यावर ती पूर्ण झाली आणि मनुष्य शांत बसलाय असं कधीच घडत नाही. एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी असं इच्छांचं भेंडोळे उलगडत जातं आणि मनुष्य त्यांच्या पूर्तीसाठी धडपडत राहतो. अगदी सामान्य मनुष्यापासून राजेमहाराजांपर्यंत सर्वांचा हाच अनुभव आहे. म्हणून बाप्पा म्हणतात, मनुष्याला होणाऱ्या निरनिराळ्या इच्छा या त्याच्या शत्रू आहेत हे माणसाने कायम लक्षात ठेवावे.
क्रमश: