व्हॅक्सिन डेपो परिसराला तळीरामांमुळे अवकळा
रात्रीच्या वेळी ओल्या पार्ट्या : ग्लास हाऊसचीही तोडफोड
बेळगाव : शहराचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॅक्सिन डेपोला सध्या ओपन बारचे स्वरुप आले आहे. रात्रीच्यावेळी अंधाराचा फायदा घेत ग्लास हाऊसच्या शेजारी, झाडांखाली बांधण्यात आलेल्या कट्ट्यांवर मद्यपींचा धिंगाणा सुरू असतो. यामुळे या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडला असून, पोलिसांचे मात्र याकडे पुरते दुर्लक्ष होत आहे. या सर्व प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो येथे अनेक दुर्मीळ प्रकारची निसर्गसंपदा सापडते. त्यामुळे सकाळी व सायंकाळी फेरफटका मारणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात मॉर्निंग वॉकर्सची संख्या मोठी असते. टिळकवाडी, अनगोळ, भवानीनगर या परिसरातील शेकडो नागरिक या ठिकाणी व्यायामासाठी येत असतात. परंतु, रात्रीच्यावेळी मद्यपींमुळे कचऱ्याचे साम्राज्य वाढले असून ओपन बारचे चित्र दिसून येत आहे.
रात्री गस्त वाढविण्याची मागणी
शहरापासून लगतच असणाऱ्या व्हॅक्सिन डेपो येथे सायंकाळी 7 नंतर वर्दळ कमी असल्याने तळीरामांचे फावले आहे. ग्लास हाऊस येथे बसण्यासाठी जागा असल्याने या ठिकाणी रात्रीच्यावेळी पार्ट्या सुरू असतात. काहीवेळा मद्यपींकडून ग्लास हाऊसच्या काचाही फोडल्या जातात. यामुळे ग्लास हाऊस परिसर भयानक दिसू लागला आहे. प्लास्टिकच्या बाटल्या, मद्याच्या बाटल्या याबरोबरच प्लास्टिक पिशव्या यामुळे परिसर भकास दिसू लागला आहे. त्यामुळे रात्री या ठिकाणी पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अर्धवट विकासकामांचा फटका
व्हॅक्सिन डेपो परिसरात अनेक विकासकामे अर्धवट स्थितीत आहेत. लाखो रुपये खर्च करून पाणी साठविण्यासाठी डॅम तयार करण्यात येत आहेत. परंतु, ते अर्धवट स्थितीत पडले आहेत. त्याचबरोबर वृक्षारोपण करण्यासाठी आणण्यात आलेली रोपे सुकून गेली आहेत. पाण्याचे व्यवस्थापन नसल्याने अनेक दुर्मीळ झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे याकडे लक्ष पुरविण्याची मागणी केली जात आहे.