कळंबच्या साईराम मल्टीस्टेटमध्ये कोट्यावधीच्या ठेवी अडकल्या
संस्थेचे चेअरमन, संचालक, बँकेतील कर्मचारी नॉट रिचेबल, खातेदार व ठेवीदार धास्तावले
कळंब प्रतिनिधी
राष्ट्रीय कृत बँका चांगले व्याज दर देत नसल्याने खातेदार खाजगी मल्टिस्टेट बँकेमध्ये जास्त व्याजदराच्या आशेने आपल्या पैशाची गुंतवणूक करत असतात. मात्र, खाजगी मल्टिस्टेटला कोणी वाली नसल्याने खातेदारांना लुबाडण्याचे काम सुरु आहे. असाच काहीसा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे समोर आला आहे. कळंब येथील साईराम अर्बन मल्टिस्टेट को ऑप.क्रे.सो.लि बीड हि शाखा तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे या शाखेचे खातेदार व ठेवीदार धास्तावले आहेत. एक-एक रुपया जमा करुन येथील कोठ्यावधी रुपयांच्या ठेवी नागरिकांनी मल्टिस्टेट बँकेत जमा केलेल्या आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसापासून बँक बंद असल्याने ठेवीदारासह सोने तारण करणारे नागरिक परेशान झाले आहेत. कळंब येथील साईराम अर्बन मल्टिस्टेट को.ऑप.क्रे.सो.लि.बीड ही खाजगी संस्था शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु होती. मात्र, गेल्या दोन ते चार दिवसांपासून ही मल्टिस्टेट बंद असल्याने ठेवीदार, सोने गहानदार, पिग्मी भरणारे छोटे व्यापारी यांचे मोठे नुकसान होण्याचे चिन्ह दिसत असल्याने या ग्राहकांना मल्टिस्टेट पैसे वापस देणार का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कळंब शहरातील नागरिकांनी मोठा विश्वास ठेऊन या मल्टीस्टेट मध्ये पैशाची गुंतवणूक केली होती. अचानक हि मल्टीस्टेट बंद झाल्याने ठेवीदार व अन्य गुंतवुणूकदार यांच्या पैशाची जबाबदारी घेण्यासाठी या संस्थेचे चेअरमन, संचालक, बँकेतील कर्मचारी नॉट रिचेबल असल्याने ठेवीदार यांच्यावर मोठे नुकसान सहन करण्याची वेळ येत आहे. साईराम अर्बन मल्टिस्टेट मध्ये जवळपास 5 ते 6 कर्मचारी काम करत होते. तर 3 पिगमी एजंट कार्यरत होते. पिगमी एजंट हे स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पार्ट टाइम म्हणून या मल्टिस्टेटची पिग्मी जमा करत होते. 3 पिग्मी एजंटचे दररोजचे 45 हजाराच्या आसपास कलेक्शन असून महिन्याकाठी 20 लाखाच्या आसपास पिगमी जमा करत होते.बँक न उघडल्याने कर्मचारी हजर राहत नसल्याने पिगमी खातेदार आता एजंट ला पैसे मागत असल्याने पिगमी एजंटवर सुद्धा मोठे संकट आले आहे. बँकेतील कांही कर्मचारी मोजक्या लोकांचे फोन उचलत असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिली आहे. बँकेची 12 कोटीची मालमत्ता विक्री झाली असून लवकरच पैसे मिळतील अशी खोटे आश्वासन देत आहेत. शाखेतील कर्मचारी कुणाच्याही संपर्कात नसल्याने ठेवीदारांच्या ठेवीचे काय होणार हा मोठा प्रश्न निर्माण आहे. साईराम अर्बन मल्टिस्टेट मध्ये एकूण तीन पिग्मी प्रतिनितीधीची नेमणूक करण्यात आली होती. या ती प्रतिनिधींचे एकूण 500 ते 550 च्या आसपास पिगमी चे खातेदार होते यांचे दररोज चे कलेक्शन हे 20 लाखाच्या आसपास होत होते. मात्र, या पिग्मी प्रतिनिधींना मल्टिस्टेट बंद असल्याने पिग्मीचे खातेदार नाहक त्रास देत आहेत. या संस्थेचे चेअरमन परभने हे सध्या नॉट रिचेबल असल्याने ठेवीची गुंतवनुक करणारे, सोने तारण करणारे,व इतर ठेव ठेवणाऱ्या खातेदाराच्या पैशावर संकट आले आहे. याबाबत अद्यापही चेअरमन परभने यांनी कसल्याही प्रकारचा खुलासा केलेला नाही.
या मल्टिस्टेट मध्ये बीड जिल्हयातील कांही कर्मचारी काम करत होते. बँक आज चालू होईल, उद्या चालू होईल अशा थापा मारुन खातेदार यांना आश्वासन देत आहेत तर चेअरमन, संचालक शाखा व्यवस्थापक हे कुणाच्याही संपर्कात नसल्याने मोठा तेढ निर्माण झाला आहे.
कळंब मध्ये या अगोदर शुभ कल्याण मल्टिस्टेट ने करोडो रुपयांचा खातेदारांना असाच चुना लावला असून त्या मागे आता साईराम अर्बन मल्टिस्टेट पण असाच चुना लावला असल्याचा प्रकार घडला आहे.
अधिक व्याजाच्या हव्यासाने नागरिकांनी आशा खाजगी मल्टिस्टेट किंवा पतसंस्थेत गुंतवणूक करु नये. राष्ट्रीयकृत बँकेत आपले पैसे व्यवस्थित राहतील आणि अशा पळून गेलेल्या व बंद पडलेल्या साईराम अर्बन मल्टिस्टेट ची तक्रार केंद्रीय सहकार मंत्री यांच्याकडे करणार आहे.
संदीप बावीकर - शहराध्यक्ष भाजपा, कळंब
दररोजच्या कामावर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता त्यामुळे मी साईराम अर्बन मल्टिस्टेटची पिग्मी एजंट म्हणून काम करत होतो. गेल्या 6 ते 7 महिन्यात माझे 125 च्या आसपास पिग्मीचे खातेदार झाले होते. त्यांचे आता 11 ते 12 लाखाच्या आसपास पिग्मी मल्टिस्टेट मध्ये जमा आहे. ही अचानक बंद झाल्याने पिग्मीचे खातेदार मला त्रास देत असल्याने माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.
अशोक शिंदे - पिगमी एजंट, कळंब