हद्दपारीचे 50 प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडे प्रलंबीत; पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत
निवडणूकीपुर्वी 30 ते 40 अधिकाऱ्यांच्या बदल्या
कोल्हापूर प्रतिनिधी
शहरातील सराईत गुन्हेगार, समाजकंटक आणि फाळकूटदादांवर हद्दपारची कारवाई केली जाते. ही कारवाई प्रांत कार्यालयातून होते. पोलीस विभागाने दिलेले 50 प्रस्ताव प्रांत कार्यालयात अद्याप प्रलंबित आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. दरम्यान जिह्यातील सुमारे 30 ते 40 अधिकाऱ्यांच्या बदल्या आगामी काळात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुह्याचे स्वरूप, वारंवारता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी प्रवृत्ती या गोष्टी तपासून त्या व्यक्तीवर हद्दपारची कारवाई केली जाते. याचे प्रस्ताव तयार करून ते प्रांत कार्यालयांकडे दिले जातात. पोलिसांच्या प्रस्तावाची शहानिशा करून प्रांत हद्दपारीची नोटीस बजावतात. शहरातील सुमारे 50 प्रस्ताव अद्याप प्रांत कार्याकडे प्रलंबित आहेत. या प्रस्तावांची तातडीने निर्गत झाल्यास हद्दपारची कारवाई करता येईल. त्याचबरोबर जे गुन्हेगार हद्दपार आहेत. ते पुन्हा शहरात येणार नाहीत त्यांचा उपद्रव होणार नाही हे तपासण्याची कारवाई पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाच्या बैठका सुरु झाल्या आहेत. कोल्हापूर पोलीस दलामध्ये कार्यकाल पुर्ण केलेल्या तसेच ज्यांचे होम टाउन कोल्हापूर आहे. अशा 30 ते 40 पोलीस अधीकाऱ्यांच्या बदल्याही होणार असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी सांगितले. तसेच पोलीस दलाकडे प्राप्त होणारे अर्ज निर्गतीचे प्रमाणही आता वाढले आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये 6 हजारहून अधिक अर्ज निर्गत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.