पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढा
अमित शहा यांचा मुख्यमंत्र्यांना फोन करुन संदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरीकांचे व्हिसे रद्द केले असल्याने प्रत्येक राज्याने आणि केंद्रशासित प्रदेशाने तेथे वास्तव्यास असलेल्या सर्व पाकिस्तान्यांना घालवून द्यावे, असा संदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना दूरध्वनीवरुन दिला आहे. पेहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानच्या विरोधात कठोर भूमिका घेण्यास प्रारंभ केला आहे. कोणत्याही पाकिस्तानी नागरीकाला यापुढे भारताचा व्हिसा दिला जाणार नसून सध्या व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तान्यांनी 48 तासांच्या आत भारत सोडावा, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. या आदेशाच्या कार्यान्वयनाला त्वरित प्रारंभ झाला आहे.
अमित शहा यांनी सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांची बैठक शुक्रवारी आयोजित केली होती. त्यानंतर हा आदेश सर्व मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. आपल्या राज्याच्या कक्षेतील सर्व पाकिस्तानी व्हिसाधाकांचा शोध घेतला जावा आणि ते स्वत:हून देशाबाहेर गेले नसतील, तर त्यांना बाहेर काढले जावे, अशी सूचना अमित शहा यांनी केली आहे.
भारताची कठोर भूमिका
पेहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताच्या पर्यटकांवर भीषण हल्ला केल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्ताच्या नाड्या आवळण्यास प्रारंभ केला आहे. भारताने 1960 मध्ये पाकिस्तानशी झालेला सिंधू जलवितरण करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत आपल्या देशातून पाकिस्तानात जाणाऱ्या सर्व नद्यांचे पाणी आडवू शकतो. तसे झाल्यास पाकिस्तानात वाहत जाणाऱ्या सिंधू नदीचे पाणी कमी होऊन पाकिस्तानात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होऊ शकते. पाकिस्तानची 80 टक्के अर्थव्यवस्था सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानची जलकोंडी केल्यास त्या देशाची अर्थव्यवस्था आणखी खालावू शकते. सिंधू जलवितरण करार स्थगितीचा परिणाम त्वरित दिसून येणार नसला, तरी ही कारवाई पाकिस्तानसाठी दीर्घकालीन संकटाचा विषय होऊ शकते. तसेच भारताने पाकिस्तानी नागरीकांना दिले जाणारे सर्व प्रकारचे व्हिसे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने कोणीही पाकिस्तानी आता भारतात येऊ शकणार नाही.
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार अभियान
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सेनेने जोरदार दहशतवाद विरोधी अभियानाचा प्रारंभ केला आहे. पेहलगामचा हल्ला पेलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी या भागातील सर्व वनक्षेत्रात कसून शोध घेतला जात आहे. शोध घेण्यासाठी हेलिकॉप्टर्सचा उपयोग केला जात आहे. भारतीय सेनेच्या अनेक तुकड्या वन विभागात पायी आणि वाहनांच्या साहाय्याने गस्त घालत आहेत. त्यांना सीमा सुरक्षा दलाचे सहकार्यही मिळत आहे, अशी माहिती संरक्षण विभागाने दिली.
गोळीबाराला चोख प्रत्युत्तर
पेहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार करण्याचा सपाटा चालविला आहे. भारतीय सैनिकांनीही या गोळीबाराला जशास तसे प्रत्युत्तर दिले असून पाकिस्तानचे मनसुबे उध्वस्त केले आहेत. भारताने सीमावर्ती भागांमध्ये अधिक सैनिकांची नियुक्ती करण्याचाही निर्णय घेतला आहे.
बांदीपुरात दहशतवादी ठार
बांदीपूर भागात एका चकमकीमध्ये अल्ताफ अली नावाचा एक दहशतवादी ठार झाला आहे. तो या भागात आहे अशी माहिती मिळाल्यावरुन भारतीय सेनेने त्याला शोधण्याचे प्रयत्न चालविले होते .त्याच्या लपण्याच्या जागी त्याला घेरण्यात आल्यानंतर त्याने गोळीबार केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत त्याला कंठस्नान घालण्यात आले. शोपियान भागातही गस्त वाढविण्यात आली आहे. या भागात संशयित दहशतवाद्यांच्या घरांची झडती घेण्यात येत असून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवाद्यांची रसद तोडण्यासाठी कृती केली जात आहे.
भूसेना प्रमुख काश्मीरमध्ये
भारताच्या भूसेनेचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे काश्मीरच्या दौऱ्यावर असून त्यांनी सीमावर्ती भागातील सेनाधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. पेहलगामसारखे हल्ले पुन्हा होऊ नयेत, यासाठी सैनिकांनी डोळ्यात तेल घालून सीमेचे संरक्षण करावे, असा आदेश त्यांनी दिला. पेहलगाम आणि शोपियानप्रमाणेच अनंतनाग येथील वनक्षेत्रातही सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे.
दहशतवाद्यांची घरे जाळली
पेहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर भागातल्या दहशतवाद्यांना भारताच्या सेनेप्रमाणेच स्थानिक नागरीकांच्या संतापालाही समोरे जावे लागत आहे. सीमावर्ती भागांमध्ये संशयित दहशतवाद्यांची घरे स्थानिकांकडून जाळण्यात येत आहेत. तीन संशयितांच्या घरांवर स्थानिकांकडून हल्ले करण्यात आले असून त्यांच्या घरांची मोडतोड करुन त्यांना आगी लावण्याच्या घटना घडल्या आहेत. पेहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनावर विपरीत परिणाम झाल्याने स्थानिकांसमोर रोजगाराचे संकट उभे राहिले असून त्यामुळे स्थानिक दहशतवाद्यांवर संतापले असल्याचे दिसून येते.
राहुल गांधी श्रीनगरमध्ये
काश्मीरमधील स्थिती जाणून घेण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी श्रीनगरला गेले आहेत. त्यांनी अनंतनागलाही भेट दिली. पेहलगाम हल्ल्यात जखमी झालेल्या आणि सध्या उपचार घेत असलेल्या पर्यटकांची त्यांनी भेट घेतली. नेमका प्रकार काय घडला याची त्यांनी चौकशी केली, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.