तारिहाळ रस्त्याची दयनीय अवस्था
रस्त्यावर मोठमोठे खड्डे : वाहतुकीला धोका
वार्ताहर /किणये
सुवर्ण विधानसौधजवळ असलेल्या तारिहाळ गावच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्यामुळे वाहतूक धोकादायक बनली आहे. प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी वाहनधारकांतून होत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. हलगा क्रॉस ते तारिहाळ या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच रस्त्याचा काही भाग उखडून गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
अगदी सुवर्ण विधानसौधच्या बाजूनेच हलगा क्रॉस येथून तारिहाळ गावचा रस्ता गेलेला आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेकवेळा या रस्त्यावर दुचाकीस्वार पडून किरकोळ अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रशासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. त्यामध्ये रस्त्यांच्या विकासासाठी विशेष निधी खर्च करण्यात येतो. मग तारिहाळ सारख्या गावच्या रस्त्याची अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था बनली आहे. या रस्त्यासाठी प्रशासनाने निधी मंजूर करावा व या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.