For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुकोबांच्या पालखीचे भक्तिभावात पंढरपूरकडे प्रस्थान

06:08 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
तुकोबांच्या पालखीचे भक्तिभावात पंढरपूरकडे प्रस्थान
Advertisement

पुणे/ प्रतिनिधी

Advertisement

 संपदा सोहळा नावडे मनाला ।

 लागला टकळा । पंढरीचा ।।

Advertisement

हा भाव....टाळ-मृदंगाचा अखंड गजर...विणेचा झंकार, आणि विठ्ठलनामाचा जयघोष...अशा भक्तिरसपूर्ण वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांचा हा 339 वा पालखी सोहळा. हा प्रस्थान सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो वैष्णवांची पावले इंद्रायणीकाठी दाटली होती. पहाटे घंटानाद झाला अन् अवघा देहूगाव जागा झाला. साडेचार देऊळवाड्यात काकडा झाला. त्यानंतर श्री विठ्ठल-ऊक्मिणी मंदिर व शिळा मंदिरात महापूजा पार पडली. तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या वतीने महापूजा करण्यात आली. सकाळी 10 ते 12 या कालावधीत  देहूकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. सकाळी अकरा वाजता  इनामदारवाड्यात संत तुकाराम महाराज पादुकांचे पूजन करण्यात आले. दुपारी दोनच्या सुमारास इनामदारवाड्यातून संत तुकाराम महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात सन्मानपूर्वक आणण्यात आल्या. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.

मंदिरात दिंड्यांना प्रवेश देण्यात आला. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन करण्यात आले. चांदीच्या सिंहासनावर, चांदीच्या ताटात तुकोबांच्या चांदीच्या पादुकांना अभिषेक करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, आमदार सुनील शेळके, महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली. नगराध्यक्षा पूजा दिवटे, तहसीलदार जयराज देशमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पादुकांचे पूजन करून पादुका पालखीत विराजमान झाल्या तसा वारकऱ्यांचा उत्साह दुणावला. टाळ-मृदंगाचा आवाज टीपेला पोहोचला. वारकरी विठ्ठलनामासोबत डोलू लागले, नाचू लागले. इंद्रायणीच्या लाटांनीही या सुरात आपले सूर मिसळले. अवघा आसमंत विठ्ठलमय झाला. काहींना तुकोबांच्या पादुकांवर माथा ठेवण्याचे भाग्य लाभले. त्यांनी धन्यत्वाचा अनुभव घेतला. तर काहींनी मनोभावे नमस्कार करीत तुकोबांचरणी आपली सेवा ऊजू केली. हरिनामाच्या गजरात अवघी देहुनगरी दुमदुमून गेली. दुपारी साडेचारनंतर पालखी प्रदक्षिणा करण्यासाठी सज्ज झाली. दोन तासांच्या पालखी प्रदक्षिणेनंतर तुकोबांची पालखी रात्रीच्या मुक्कामासाठी इनामदारवाड्याकडे मार्गस्थ झाली.

 देहू संस्थानकडून सेवा रूजू

देहू संस्थानचे अध्यक्ष पुरूषोत्तम महाराज मोरे यांच्या उपस्थितीत जगद्गुरू संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. विठ्ठल-रूक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली. पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

दरम्यान, तुकोबांची पालखी शनिवारी सकाळी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल. देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा दर्गा येथे पालखीची आरती होईल. ज्ञानोबा-माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतील.  त्यानंतर शनिवारी रात्री तुकोबांची पालखी पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.

 माउलींच्या पालखीचे आज प्रस्थान

दरम्यान, संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे शनिवारी अलंकापुरीतून पंढरीकडे प्रस्थान होत आहे. यानिमित्ताने मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत एकवटले आहेत. इंद्रायणीचा काठ भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. आळंदीत दिंड्यांचे आगमन झाले असून, हरिनामाच्या गजरात अलंकापुरी दुमदुमून गेली आहे.

Advertisement
Tags :

.