For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्याय प्रक्रियेत फॉरेन्सिक मेडिसीन विभाग महत्त्वाचा

11:34 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
न्याय प्रक्रियेत फॉरेन्सिक मेडिसीन विभाग महत्त्वाचा
Advertisement

कायदा मंत्री एच. के. पाटील यांचे मत  : जेएनएमसी कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिको लिगल विभाग आयोजित राज्य परिषदेचे उद्घाटन

Advertisement

बेळगाव : फॉरेन्सिक मेडिसीन तज्ञांनी दिलेल्या अहवालावर न्यायालयाला अचूक निर्णय देण्यासाठी मदत होते. एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा करण्यासाठी फॉरेन्सिक विभागाचा अहवाल हा महत्त्वाचा पुरावा ठरतो. त्यामुळे न्याय प्रक्रियेमध्ये फॉरेन्सिक मेडिसीन हा विभाग महत्त्वाचा आहे असे मत राज्याचे कायदा व संसदीय मंत्री एच. के. पाटील यांनी व्यक्त केला. काहेर विद्यापीठाच्या जेएनएमसी कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिको लिगल विभागातर्फे आयोजित वार्षिक राज्य परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. केएलई शताब्दी सभागृहात शुक्रवारी सकाळी या परिषदेचे उद्घाटन एच. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष म्हणून केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे उपस्थित होते. व्यासपीठावर कुलगुरु डॉ. नितीन गंगाणे, जेएनएमसीच्या प्राचार्या डॉ. निरंजना महंतशेट्टी, आयोजन समिती प्रमुख डॉ. रविंद्र होन्ननुगर व सचिव डॉ. विनय बन्नूर उपस्थित होते. एच. के. पाटील पुढे म्हणाले, राज्यातील मेडिकल कॉलेजमधून बहुसंख्येने फॉरेन्सिक तज्ञ तयार झाल्यास चुकीचे निर्णय लागणार नाहीत. जेएनएमसीने अधिकाधिक फॉरेन्सिक तज्ञ तयार व्हावेत यावर भर द्यावा.

पुरस्कार वितरण

Advertisement

प्रारंभी स्कूल ऑफ म्युझिकच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. डॉ. रविंद्र यांनी स्वागत केले. दीपप्रज्ज्वलनानंतर एच. के. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कर्नाटक मेडिको लिगल सोसायटी व सोसायटीचे आजीव सदस्यांतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. बेंगळूरच्या मेघना नारायण या अंतिम परीक्षेत सुवर्णपदकाच्या मानकरी ठरल्या. त्याबद्दल त्यांना तसेच मंगळूरच्या आदिती एस., नव्या भंडारी, म्हैसूरच्या शरण्या बोस व पूर्णा बन्सल यांना पुरस्कार देण्यात आले. याचवेळी फॉरेन्सिक मेडिसीन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल धुळे येथील डॉ. मंजुळाबाई के. एच., मणिपाल येथील डॉ. शंकर बक्कन्नवर, हरियाणा येथील डॉ. अर्पण कुमार यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच जेएनएमसीच्या फॉरेन्सिक विभागातील माजी विद्यार्थी डॉ. मंजुनाथ व्ही., डॉ. गजानन नायक, डॉ. अशोककुमार शेट्टी, डॉ. प्रदीपकुमार एन. व्ही., डॉ. एम. जी. शिवरामू यांचाही सत्कार करण्यात आला.

300 हून अधिक डॉक्टरांची उपस्थिती

अध्यक्षीय समारोप करताना डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, पूर्वी हा विभाग दुर्लक्षित विभाग म्हणून विद्यार्थी या क्षेत्राकडे वळत नसत पण आज चित्र बदलले आहे. या परिषदेला 300 हून अधिक डॉक्टर आले आहेत. याचा मला आनंद आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने  फॉरेन्सिक मेडिसीनचे शिक्षण घेऊन न्यायव्यवस्थेला साहाय्यभूत व्हावे. कर्नाटक व बेळगावमधील आयपीएस, पीएसआय यांना सुद्धा आपल्या कॉलेजमधून प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. विनय बनसूर यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.