डेन्मार्क बॅडमिंटन स्पर्धा आजपासून
सिंधू, लक्ष्य यांचा सूर मिळविण्यासाठी प्रयत्न
वृत्तसंस्था / ओडेन्स (डेन्मार्क)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या डेन्मार्क खुल्या सुपर 750 आंतरराष्ट्रीय पुरुष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. भारताचे अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हरविलेला सूर मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहतील.
850,000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत विविध देशांचे अव्वल बॅडमिंटनपटू सहभागी होत आहेत. गेल्या आठवड्यात फिंडलॅन्डमध्ये झालेल्या आर्किटीक खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू आणि लक्ष्य सेन यांना खूपच अवघड समस्येला तोंड द्यावे लागले होते. भारताची माजी विश्वविजेती पी. व्ही. सिंधू हिला फिनलॅन्डमधील स्पर्धेत पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. तर 2021 च्या विश्व बॅडमिंटन स्पर्धेतील कास्यपदक विजेत्या लक्ष्य सेनला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला होता. 2024 च्या बॅडमिंटन हंगामातील विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूरवरील ही तेरावी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे. लक्ष्य सेनला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चौथ्या स्थानावर मानावे लागले होते. तर गेल्या आठवड्यात फिनलॅन्डमध्ये झालेल्या स्पर्धेत लक्ष्य सेनला चीन तैपेईच्या चेनने पराभूत केले होते.
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत लक्ष्य सेनचा पहिल्या फेरीतील सामना चीनच्या झु बरोबर होणार आहे. व्यावसायिक बॅडमिंटन क्षेत्रामध्ये लक्ष्य सेनने यापूर्वी एकदाही झु बरोबर लढत दिलेली नाही. पहिल्या फेरीतील सामना जिंकला तर सेनला कदाचित इंडोनेशियाच्या ख्रिस्टीशी मुकाबला करावा लागेल. विद्यमान विश्वविजेता थायलंडचा के. व्हिटीडेसम बरोबर मुकाबला करण्यासाठी लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत वाट पहावी लागेल. महिलांच्या एकेरीमध्ये पी. व्ही. सिंधूला फिनलॅन्ड बॅडमिंटन स्पर्धेत कॅनडाच्या ली ने पराभूत केले होते. डेन्मार्कमधील स्पर्धेत सिंधूचा पहिल्या फेरीतील सामना चीन तैपेईच्या पो बरोबर होईल. महिला एकेरीमध्ये भारताचे अन्य बॅडमिंटनपटू मालविका बनसोड, आकर्षी काश्यप आणि उनाती हुडा सहभागी होत आहेत. मालविकाने चायना खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. तिचा डेन्मार्क स्पर्धेत सलामीचा सामना व्हिएतनामच्या लीन बरोबर होईल. आकर्षी काश्यपचा पहिल्या फेरीतील सामना थायलंडच्या के. सुपींदाशी तर हुडाचा सलामीचा सामना अमेरिकेच्या लेम बरोबर होणार आहे. पुरुष दुहेरीमध्ये भारताचा एकही बॅडमिंटनपटू सहभागी झालेला नाही. महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.