डेंग्यूने घेतला माडग्याळमधील युवकाचा बळी! गावात 50 हून अधिक डेंग्यूचे रूग्ण
: आरोग्य विभाग झाला सतर्क
वार्ताहर माडग्याळ
जत तालुक्यातील माडग्याळ येथील एका युवकाचा डेंग्यूने बळी घेतला. बिराप्पा शिवाप्पा बंडगर (35) असे मयत युवकाचे नाव आहे. मिरज येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने माडग्याळमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. माडग्याळ गावात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गावात तापाचे पन्नास हून अधिक पेशंट असून माडग्याळ मधील खासगी हॉस्पिटल फुल्ल आहेत. त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मयत बिराप्पा बंडगर यांना तीन दिवसांपूर्वी थंडी ताप येत होता. त्यांनी गावातीलच खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. उपचारा दरम्यान त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. शरीरातील पेशी कमी होत होत्या. त्याला पुढील उपचारासाठी मिरज येथील खासगी हॉस्पिटलमध्ये सोमवारी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचं पश्चात आई, वडील, पत्नी दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, बिराप्पा बंडगर हा युवक अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याचे गावात सीएससी सेंटर होते. कायमच शेतकऱ्यांना मदत करत होता. महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळांमध्ये, बांधकाम कामगारांचे फार्म भरून परिसरातील अनेक बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळवून दिला होता. त्याचा अचानक निधन झाल्याचे समजताच गावात हळहळ व्यक्त होत आहे.