माणिकवाडीतील विवाहितेचा डेंग्यूने घेतला बळी ! गावात भीतीचे वातावरण
आणखी एका वृद्धावर उपचार सुरू : रूग्णांची संख्या पन्नासहून अधिक
वाळवा तालुक्यातील माणिकवाडी येथील एका महिलेचा डेंग्यूने बळी घेतला. स्नेहल रोहित खोत (21) असे या महिलेचे नाव आहे. येथील कोयना हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान स्नेहल यांचा मृत्यू झाला. या घटनेने माणिकवाडी येथे भीतीचे वातावरण पसरले आहे.
माणिकवाडी गावात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. सुमारे पन्नासहून अधिक रूग्ण असून त्यांच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. स्नेहल खोत यांच्यावर कोयना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त झाली. स्नेहल यांचा विवाह अवघ्या एक वर्षापूर्वी झाला होता. त्यांच्या पश्चात पती, सासू-सासरे, दीर असा परिवार आहे. या प्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद आहे.
गावातील शहाजी भाऊ खोत (67) यांच्यावर इस्लामपूर येथेच एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून माणिकवाडी येथे डेंग्यूने हात-पाय पसरले. सुरवातीच्या टप्प्यात शासकीय आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने गांभीर्याने लक्ष घातले नाही. दिवसागाणिक रूग्णांची संख्या वाढत गेली. त्यानंतर आरोग्य विभागाने घरोघरी जावून सर्व्हे सुरू केला. पाण्याची तपासणी करण्याची मोहीम राबविली. सध्या उपाययोजना केल्या जात आहेत. पण एका मा†हलेचा बळी डेंग्यूने घेतला. राजारामबापू दूध संघाचे संचालक संजय शिंदे यांनी साथ आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना करावी, असे आवाहन केले होते.