काँग्रेस खासदाराकडे सापडलेल्या अवैध रकमेच्या निषेधार्थ निदर्शने
कारवार भाजपतर्फे निषेध मोर्चा : भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
कारवार : झारखंडमधील काँग्रेसचे राज्यसभा खासदार प्रसाद साय यांच्या घरात 300 कोटीहून अधिक रोकड सापडल्याच्या निषेधार्थ कारवार जिल्हा भाजपतर्फे सोमवारी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष वेंकटेश नायक यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या निषेध मोर्चात जिल्ह्यातील भाजप नेते आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी उपस्थितांनी नगरपालिका उद्यानातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर काहीकाळ ठाण मांडून आंदोलन छेडले. पुढे मुख्य रस्त्यावरून निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चावेळी काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर निषेध मोर्चा सुभाष सर्कलपर्यंत नेण्यात आला. माजी शिक्षणमंत्री विश्वेश्वर हेगडे यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला मालार्पण केले. याप्रसंगी बोलताना विश्वेश्वर हेगडे म्हणाले, आमच्या देशातील भ्रष्टाचाराचा जनक काँग्रेस पक्षच आहे. भ्रष्टाचाराच्या बाबतीत काँग्रेस चॅम्पियन आहे. खासदाराच्या घरात 300 कोटीहून अधिक रक्कम सापडली आहे. ही रक्कम प्रसाद साय यांनी भ्रष्टाचारातून गोळा केली आहे. स्वातंत्र्यानंतर एवढ्या मोठ्याप्रमाणात रोकड सापडायची ही पहिलीच वेळ आहे. काँग्रेसला विकासाच्या नावाखाली मते मागण्याची हिंमत राहिलेली नाही. भ्रष्टाचारातून गोळा केलेली रक्कम वापरून काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणूक लढवायची आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष वेंकटेश नायक, विधान परिषद सदस्य गणपती उळवेकर, माजी आमदार सुनील हेगडे आदींची समयोचित भाषणे झाली.