महिलेच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबीयांची निदर्शने
बेळगाव : विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी कोणती कारवाई केली, याची विचारणा करण्यासाठी रविवारी त्या विवाहितेच्या कुटुंबीयांनी खडेबाजार पोलीस स्थानकासमोर निदर्शने केली. पोलीस अधिकाऱ्यांनी संतप्त कुटुंबीयांची मनधरणी केली. मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी गोंधळी गल्लीतील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल झालेल्या आरती अनिल चव्हाण (वय 30 रा. सागरनगर, कंग्राळी खुर्द) या महिलेचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आरतीचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. यासंबंधी एफआयआरही दाखल केले होते.
या घटनेला 13 दिवस उलटले. संबंधितांवर कोणती कारवाई केली आहे? अशी विचारणा करीत रविवारी सायंकाळी आरतीच्या 100 हून अधिक नातेवाईकांनी खडेबाजार पोलीस स्थानकासमोर निदर्शने केली. पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांची भेट घेऊन त्यांनी कारवाईसंबंधी चर्चा केली. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतर मृत्यूचे कारण समजणार आहे. पोलीस दलाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. मृत्यूप्रकरणाची कसून चौकशी करण्यात येईल, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी यांनी दिली. पोलिसांना शवचिकित्सा अहवालाची प्रतीक्षा आहे.