For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खासदार अनंतकुमार हेगडेंच्याविरोधात शेतकरी संघटनेची निदर्शने

10:21 AM Mar 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
खासदार अनंतकुमार हेगडेंच्याविरोधात शेतकरी संघटनेची निदर्शने
Advertisement

खानापूर : लोकसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्याने कारवार लोकसभा मतदारसंघाचे खासदार अनंतकुमार हेगडे गेल्या पंधरा दिवसांपासून तीनवेळा खानापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. बुधवारी त्यांनी खानापूर तालुक्याचा दौरा केला. यावेळी या दौऱ्याबाबत तालुक्यातील जनतेतून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. नेगीलोगी रयत संघटनेतर्फे खासदार अनंतकुमार हेगडे यांची गाडी अडवून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसानी हस्तक्षेप करून घोषणाबाजी करणाऱ्या रयत संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून खासदार हेगडे यांच्या ताफ्याचा मार्ग मोकळा करून दिला. दौऱ्यावेळी त्यांच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. खानापूर तालुका कायमच अनंतकुमार हेगडे यांच्या पाठिशी खंबीर राहून मताधिक्क देत आलेला आहे. मात्र त्यांनी गेल्या 25 वर्षात खानापूर तालुक्यासाठी कोणतेही भरीव कार्य केले नाही. तसेच खानापूर तालुका मतदारसंघात ते फिरकतही नाहीत. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायमच तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Advertisement

तीन वर्षापूर्वी कोरोनाकाळात व महापुराच्यावेळी खासदार हेगडे यांनी तालुक्याकडे साफ दुर्लक्ष केले होते. मात्र लोकसभा निवडणूक अवघ्या महिन्यावर येऊन ठेपल्याने गेल्या काही दिवसांपासून खानापूर तालुक्याचा दौरा करत आहेत. प्रत्येक दौऱ्यावेळी त्यांच्या विरोधात निदर्शने आणि प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.तालुका भाजपमध्येही त्यांच्या विरोधात दोन गट आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांतून तीव्र नाराजी आहे. अनंतकुमार हेगडेंच्या विरोधात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे काही कार्यकर्त्यानी आपल्या  प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच सामान्य जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. बुधवार दि. 6 रोजी अनंतकुमार हेगडे यांच्या दौऱ्यावेळी खानापूर शिवस्मारक चौकात रयत संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गाडीसमोर जोरदार निदर्शने करत घोषणा दिल्या. तसेच भाजपने अनंतकुमार यांना उमेदवारी दिल्यास राज्य रयत संघटनेतर्फे लोकसभा मतदार संघात त्यांच्या विरोधात प्रचार करू, असे जाहीर केले आहे. यावेळी राज्य रयत संघटनेचे राज्याध्यक्ष रवि पाटील, राजशेखर हिंडलगी, जोतिबा भेंडगिरी, राघवेंद्र चलवादी, संतोष पेडसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.