ड्रोन हल्ल्यांविरोधात मणिपूरमध्ये निदर्शने
राजभवन अन् मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानानजीक पोहोचला जमाव : पोलिसांकडून अश्रूधूराचा वापर
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या इंफाळमध्ये अलिकडेच झालेल्या ड्रोन हल्ल्यांच्या विरोधात हजारो लोक रविवारी रात्री उशिरा रस्त्यांवर निदर्शनांसाठी उतरले. किशमपेटच्या टिडिम रोडवर 3 किलोमीटर अंतरापर्यंत रॅली काढल्यावर निदर्शक राजभवन आणि मुख्यमंत्री निवासस्थानापर्यंत पोहोचले. यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलांनी त्यांना बॅरिकेड लावून रोखले. जमावाल पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधूराचा मारा करण्यात आला. यामुळे संतप्त निदर्शकांनी रस्त्यांवर बसून घोषणा देण्यास सुरुवात केली. ड्रोन हल्ल्s रोखण्यास राज्य सरकार आणि पोलीस अपयशी ठरले असून पोलीस महासंचालकांना पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी निदर्शकांनी केली आहे.
मणिपूरमध्ये मे 2023 पासून कुकी आणि मैतेई समुदायादरम्यान हिंसा सुरू आहे. मागील 7 दिवसांपासून या हिंसेची तीव्रता वाढली आहे. या 7 दिवसांत 8 लोकांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. अलिकडेच मणिपूरमध्ये ड्रोनद्वारेही हल्ले झाले आहेत. या ड्रोन हल्ल्याद्वारे मैतेई समुदायाला लक्ष्य करण्यात आले असून यात दोन जणांना जीव गमवावा लागला आहे.
1 सप्टेंबर रोजी राज्यात पहिल्यांदा ड्रोन हल्ला दिसून आला होता. इंफाळ पश्चिम जिल्ह्याच्या कोत्रुक गावात उग्रवाद्यांनी पर्वतीय क्षेत्रातून ड्रोन हल्ला घडवून आणला. यात 2 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी झाले. तर इंफाळ जिल्ह्याच्या सेजम चिरांग गावात उग्रवाद्यांनी ड्रोन हल्ले केले आहेत. यात एका महिलेसमवेत 3 जण जखमी झाले आहेत. उग्रवाद्यांनी नागरी वस्तीत ड्रोनद्वारे 3 स्फोटके पाडविली, जी घरांचे छत फोडून आत कोसळली. याचबरोबर कुकी उग्रवाद्यांनी पर्वतीय भागातून गोळीबार देखील केला आहे.
माजी मुख्यमंत्र्यांच्या घरी रॉकेटने हल्ला
मणिपूरच्या विष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांगमध्ये माजी मुख्यमंत्री मॅरेम्बम कोइरेंग यांच्या घरी कुकी उग्रवाद्यांनी रॉकेट बॉम्ब फेकला होता. या हल्ल्यात एका वृद्धाचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मॅरेम्बम कोइरेंग हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. 7 सप्टेंबर रोजी जिरिबाम येथे उग्रवाद्यांनी एका घरात घुसून झोपलेल्या वृद्धाला गोळ्या घातल्या होत्या. तर अन्य एका घटनेत कुकी आणि मैतेई लोकांदरम्यान गोळीबार झाला, ज्यात 4 जणांचा मृत्यू झाला होता.
राज्य सरकारची शक्ती वाढवा
मुख्यमंत्री एम. विरेन सिंह यांनी राज्यपाल लक्ष्मण आचार्य यांननी 8 सूत्री मागण्यांची एक यादी सोपविली आहे. यात घटनेनुसार राज्य सरकारला शक्ती आणि जबाबदाऱ्या सोपविण्यात यावे असे म्हटले गले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी कुकी उग्रवाद्यांसोबतचा सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स करार रद्द करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून सुरक्षा दलांना पूर्ण शक्तिनिशी कुकी उग्रवाद्यांवर कारवाई करता येईल. याचबरोबर राज्यात एनआरसी प्रक्रिया सुरू करणे आणि सर्व घुसखोरांना देशाबाहेर काढण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
राज्यात आतापर्यत 226 जणांचा मृत्यू
मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून कुकी आणि मैतेई समुदायादरम्यान हिंसा सुरू आहे. शासकीय आकडेवारीनुसार हिंसेत आतापर्यंत 226 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. 65 हजाराहून अधिक लोकांना जीव वाचविण्यासाठी स्थलांतर करावे लागले आहे